बाह्यवळण मार्गासाठी तीनशे कोटींचा निधी

पुणे : पुणे- बेंगळुरू बाह्यवळण महामार्गावरील (कात्रज- देहू बाह्यवळण) वाहतूक कोंडी सुटण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी सुचविलेल्या उपाययोजनांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हिरवा कंदील दाखवून या उपाययोजनेसाठी तात्काळ तीनशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता दिल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
पुणे- बेंगळुरू महामार्गावरील कात्रज-देहू बाह्यवळणावर कोंडीची समस्या अत्यंत गंभीर आहे. त्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी वाहतूक पोलीस अधिकारी, महापालिका, पोलीस आयुक्तांसह एनएचएआयच्या अधिकाऱ्यांसोबत वारंवार बैठका घेऊन, प्रत्यक्ष मार्गावर जाऊन पाहणी करून कोंडीच्या कारणांसह उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा केली.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सरव्यवस्थापक अंशुमाळी श्रीवास्तव, प्रकल्प संचालक संजय कदम, महापालिकेचे शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, वाहतूक नियोजनकार निखिल मिजार, आर्किटेक्ट (मेटा आर्च) मिलिंद रोडे यांच्यासह इतर सहकाऱ्यांसमवेत उपाययोजनांचा अहवाल तयार केला.
हेही वाचा – पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचा दावा!
हा अहवाल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर मांडल्यानंतर गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पुणे वाहतूक पोलिसांना एकत्र बैठक घेण्याच्या सूचना दिल्या, तसेच ३०० कोटी रुपयांच्या खर्चास तत्वत: मान्यताही दिली.त्यामुळे या बाह्यवळण मार्गावरील कोंडीची समस्या सुटून पुणेकरांना दिलासा मिळेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
प्रस्तावित विकास कामे
– भूमकर अंडरपास शेजारी प्री-कास्ट बॉक्स पद्धतीचा जोड अंडरपास
– किया आणि रिनॉल्ट शोरूम येथे दोन अंडरपास
– नऱ्हेच्या दिशेने कॉन्टिलिव्हर ब्रीज, तसेच अन्य लेन सिग्नल फ्री करणे
– पाषाण- सुस रोडवरून हायवेला जोडणारा रस्ता आणि सर्व्हिस रोड पूर्ण करणे
-२७.९९ किमी लांबीचे आणि १२ मीटर रुंदीचे सर्व्हिस रोड करणे.
– ४९.१२ लांबीचा व १२ किमी रुंदीचा बाह्य सेवारस्ता तयार करणे.
– बालेवाडी स्टेडियमसमोर मुंबईला जोडण्यासाठी उड्डाणपूल उभारणे
का होते वाहतूक कोंडी
– पाच वर्षांत २० लाख वाहने वाढली
– शहराबाहेरील भाग विकसित झाले; लोकसंख्या वाढली
– आयटी पार्क, औद्योगिक आणि शैक्षणिक संस्थांचे जाळे
– १०० पेक्षा अधिक अपघात; ६८ लोकांनी जीव गमावला, ५४ जण गंभीर जखमी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे- बेंगळुरू रस्त्यावरील उपाययोजनांना तत्त्वतः मान्यता दिली आहे. त्यासाठी एनएचआय, पुणे महापालिका, तसेच पुणे पोलिसांनी एकत्रिकपणे या उपाययोजना करण्यास सांगितले आहे.
– चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री.





