स्वीकृतच्या 24 जागांसाठी 121 उमेदवार रिंगणात
- 26 एप्रिल रोजी होणार निवडणूक
पिंपरी – महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग समितींवर सामाजिक संघटनांच्या प्रतिनींना स्वीकृत सदस्य म्हणून काम करण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यासाठी आठ प्रभागातील इच्छुकांचे अर्ज मागविण्यात आले. स्वीकृतच्या एकूण 24 जागांसाठी 160 अर्ज आले. त्यातील 121 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत. या उमेदवारांसाठी 26 एप्रिल रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत तिकीट मिळवून देण्याचा शब्द शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी कार्यकर्त्यांना दिला होता. तरीही, काही कार्यकर्त्यांना ऐनवेळी डावलण्यात आले. त्यामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांना स्वीकृत सदस्य म्हणून काम करण्याची संधी देण्यात येणार आहे. अ, ब, क, ड, ई, फ, ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयांमधील प्रभाग समित्यांवर स्वीकृत सदस्य म्हणून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी पक्षाकडून इच्छुकांचे अर्ज मागविले होते. आठ क्षेत्रीय कार्यक्षेत्रातून तब्बल 160 अर्ज आले आहेत. त्याची छानणी केल्यानंतर 121 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. तर, उर्वरीत 39 अर्ज अवैध ठरले आहेत. एकूण 24 जागांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे.
प्रत्येक प्रभागावर तीन सदस्यांची निवड केली जाणार आहेत. आठ प्रभागांसाठी तब्बल 24 सदस्यांची निवड होणार आहे. त्यासाठी प्रत्येक प्रभाग समितीमधील 16 सदस्यांचे उमेदवारांसाठी मतदान घेण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांना सर्वाधिक मते मिळतील, त्याची निवड होणार आहे. येत्या 26 एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार आहे.