breaking-newsपुणे

‘सेल्फी उच्छादा’मुळे प्रशासन वेठीस

पर्यटन स्थळांवर ‘सेल्फी’ घेण्याच्या उच्छादाची दखल प्रशासन यंत्रणेला घ्यावी लागली आहे.  ‘सेल्फी’ काढण्याच्या नादात तोल जाऊन पर्यटकांनी जीव गमावल्याच्या किंवा पर्यटक जखमी झाल्याच्या घटना पावसाळ्यात विविध ठिकाणी घडतात. या पाश्र्वभूमीवर जिल्ह्य़ातील पर्यटन स्थळांवरील धोकादायक ठिकाणे ‘नो सेल्फी झोन’ म्हणून निश्चित करण्यात येणार आहेत. याबाबत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून त्यांच्या अखत्यारित येणाऱ्या पर्यटन स्थळांची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे एकत्रित करण्यात येत असून संबंधित ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत या कक्षाकडून सूचनाही लावण्यात येणार आहेत.

मोसमी पावसाने शहरासह जिल्ह्य़ात जोरदार हजेरी लावली आहे. सध्या अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. कोंढवा आणि आंबेगाव बुद्रुक येथे सीमाभिंत कोसळून कामगार मृत्युमुखी पडल्याच्या पाश्र्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पर्यटन स्थळांवरील धोकादायक ठिकाणे शोधून तेथे कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

पावसाळ्यात नदीकाठची गावे, धरणांच्या पाणलोट क्षेत्राच्या परिसरातील ठिकाणे, गड-किल्ले, पर्यटन स्थळे, डोंगरातून कोसळणारे धबधबे अशा निसर्गरम्य ठिकाणी पर्यटकांची दरवर्षी गर्दी होते. अशा ठिकाणी मोबाइलमध्ये ‘सेल्फी’ काढण्याच्या नादात पाय घसरून, पाण्यात पडून किंवा अन्य कारणांनी अनेक पर्यटकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्य़ातील अशा पर्यटन स्थळांवर किती धोकादायक ठिकाणे आहेत, ते पाहून अशी ठिकाणे निश्चित केली जाणार आहेत. या ठिकाणी संरक्षक भिंत, अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था, धोक्याची सूचना देणारे फलक आहेत का, याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाने मागवली आहे. ही माहिती प्राप्त होताच या ठिकाणांवर पर्यटकांच्या गर्दीचा ओघ पाहून सुरक्षा व्यवस्थेबाबत अधिकाऱ्यांवर कामाची जबाबदारी निश्चित करण्यात येईल. सुरक्षा रक्षकांची अतिरिक्त कुमक देण्यात येणार असून धोकादायक ठिकाणचे ‘नो सेल्फी झोन’ निश्चित केले जातील.

पर्यटन स्थळांवरील धोकादायक ठिकाणी ‘नो सेल्फी झोन’ निश्चित करण्यात येणार आहेत. अशा ठिकाणांची निश्चिती करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पोलिस प्रशासन, जलसंपदा विभाग आणि प्रत्येक तालुक्यामधील तहसीलदारांकडून माहिती मागवण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button