वा-याची दिशा कळताच शरद पवारांची माढातून मागार – विजय शिवतारे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/458.jpg)
- सुजय विखे, पार्थ पवार यांचं कर्तृत्व काय?, फक्त नेत्यांची मुलं म्हणून पक्षात घेणार?
- जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी उपस्थित केला प्रश्न
पुणे – शरद पवार यांना वार्याची दिशा समजल्याने त्यांनी माढा लोकसभा मतदार संघातून माघार घेतली, असा टोला जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी लगावला आहे. सुजय विखे आणि पार्थ पवार यांचं कर्तृत्व काय आहे. फक्त नेत्यांची मुलं म्हणून पक्षात घेणार का ? असा सवालही शिवतारे यांनी विचारला आहे.
पुण्यातील वैशाली हॉटेल येथील कट्ट्यावर विजय शिवतारे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सध्या मावळमधून पार्थ पवार आणि नगर येथून सुजय विखे यांच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरू आहे. या दोघांचे काय कर्तुत्व आहे. ते केवळ नेत्यांची मुले आहेत म्हणून त्यांना उमेदवारी देणार का? असा सवाल विचारताना या दोघांनी किमान दहा वर्ष समाजासाठी काम करण्याची आवश्यकता होती. त्यानंतर त्यांच्या उमेदवारीचा विचार पक्षांनी करायला हवा होता, असं मत त्यांनी व्यक्त केलंय.
सायकल, श्रवण यंत्र, चप्पल वाटणे हे खासदार म्हणून सुप्रिया सुळे यांचे कामे नाही. अशा स्वरूपाची कामे समाजातील अनेक मंडळाचे पदाधिकारी देखील करतात. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार म्हणून सुप्रिया सुळे अपयशी ठरल्या आहेत, अशी टीका शिवतारे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केली. 2014 साली झालेल्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना केवळ बारामती तालुक्यातून लीड मिळाल्याने विजयी झाल्या, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
शरद पवार यांना वार्याची दिशा समजल्याने माढा लोकसभा मतदार संघातून माघार घेतली. शरद पवार यांचे कार्य खूप मोठे आहे. पण मागील निवडणुकीतील माढामधील कामाबाबत जनतेमध्ये शरद पवार यांच्याविषयी प्रचंड नाराजी आहे, असं विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे.
बारामती लोकसभा निवडणूक लढवणार का या प्रश्नावर ते म्हणाले की, बारामती लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे असल्याने यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या जागेबाबत निर्णय घेतील. पक्षाने निवडणूक लढविण्याचा आदेश दिल्यास पुढील निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका त्यांनी मांडली.
आघाडी सरकारच्या काळात पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार होते. अजित पवार प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले. या जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील गुंजवणी धरणाचा प्रश्न का मार्गी लावला नाही ? असा प्रश्न त्यांनी विचारला. युतीचे सरकार आल्यावर मी पुरंदरचे प्रश्न मार्गी लावले असंही शिवतारे यांनी सांगितलं.