राज्य सरकारने पुणे महानगरपालिकेला आर्थिक मदत द्यावी-महापौर मुरलीधर मोहोळ
पुणे : “कोरोना संकटाच्या काळात गेली साडेचार महिने पुणे महापालिकेने अडीचशे कोटी रुपये पेक्षा जास्त खर्च करत सर्व यंत्रणा सक्षमपणे चालविली, कोणतीही आर्थिक अडचण येऊ दिली नाही. परंतु आता राज्य शासनाने पुणे महापालिकेला आर्थिक मदत द्यावी”, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज (२७ जुलै) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. कोरोना निर्मूलन आढाव्याच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालय येथे संपन्न झाली. त्यावेळी महापौरांनी ही मागणी केली.
महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की, “पुणे शहरात नव्याने तीन जम्बो आयसोलेशन सेंटर उभे करण्यात येणार आहेत. यामध्ये तिन्ही सेंटरमध्ये ऑक्सिजन व आयसीयू बेड्स उभे करण्यात येणार आहेत. कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे, एसएसपीएमएस ग्राउंड येथे हे नियोजन असून पुढील वीस दिवसात पीएमआरडीएच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे. यासाठी एकूण ३०० कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. त्यात राज्य शासन ५०% पुणे महानगरपालिका २५% पिंपरी चिंचवड महानगरपालिका १२.५% आणि पीएमआरडीए १२.५% असा हिस्सा उचलणार आहेत.”
पुणे महानगरपालिकेला राज्य सरकारने आर्थिक बळ द्यावे !
“जम्बो आयसोलेशन सेंटर ला राज्यशासन ५०% निधी देणार आहेत, यासाठी राज्यशासनाचे धन्यवाद! गेली साडेचार महिने पुणे महानगरपालिकेने आत्तापर्यंत अडीचशे कोटी रुपयेपेक्षा जास्त खर्च केले आहेत. जम्बो आयसोलेशन सेंटरला अशा गरजेच्या वेळी पुणे महापालिका निधी देण्यास नकार देणार नाही. परंतु पुढील काळात राज्यशासनाने पुणे महापालिकेला आर्थिक रसद पुरवली आणि महापालिकेला बळ द्यावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे केली आहे”, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.