बडे थकबाकीदार पुन्हा महावितरणच्या रडारवर
![MSEDCL shocked by local bodies](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/mahavitran.jpg)
पुणे – खर्च आणि उत्पन्न यांचा समन्वय साधण्यासाठी महावितरण प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पुन्हा एकदा वसुलीची कडक मोहीम राबविण्याचा महत्वपूर्ण निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी खास पथकांची स्थापना करण्यात आली आहे. त्यानुसार येत्या आठवडाभरात ही मोहिम सुरू करण्यात येणार आहे.
राज्यभरातील सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मात्र, थकबाकीचा टक्का कमी करण्यासाठी जंग-जंग पछाडूनही प्रशासनाला अपेक्षित यश आलेले नाही. त्यामुळे उत्पन्न आणि खर्च यांच्यात कमालीची तफावत निर्माण झाली आहे. परिणामी, हा ताळमेळ बसविण्यासाठी महावितरणने गेल्या सहा महिन्यांत थकबाकीदारांविरोधात प्रभावी मोहीम राबविली होती. त्यामध्ये काही प्रमाणात यश आले असले, तरीही थकबाकीचा टक्का काही प्रमाणात वाढू लागला आहे. त्यामुळेच पुन्हा एकदा अशा प्रकारची मोहीम राबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून आठवडाभरात त्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे.
याबाबत महावितरणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी पी. एस. पाटील म्हणाले, वसुलीत गेल्या काही महिन्यांत अपेक्षित यश आले आहे. तरीही, थकबाकी शुन्यावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून ही मोहीम राबविली जात आहे.