पुण्यात बोगस डॉक्टर चालवत होता दारु मुक्ती केंद्र
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/download-2.jpg)
पुणे – वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक ‘एमबीबीएस’ ही पदवी घेतलेली नसतानाही वैद्यकीय व्यवसाय थाटण्याबरोबरच एक दारू मुक्ती केंद्र चालविणाऱ्या बोगस डॉक्टरविरुद्ध येरवडा पोलिस ठान्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी याप्रकरणी बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी डॉ.तिरुपती पांचाळ (वय 31) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून येरवडा येथील एका दारूमुक्ती केंद्र चालविणाऱ्या बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी आहेत. येरवडा येथील भाजी मार्केट परिसरात डिसेंबर 2018 पासून एका व्यक्तीकडून दारू मुक्ती केंद्र चालविले जात होते. संबंधित व्यक्ती एमबीबीएस नसतानाही ‘जस्ट डायल’च्या वेबसाईटवर स्वत:च्या फोटोखाली एमबीबीएस पदवी धारण केल्याचा उल्लेख केला होता.
तसेच आपल्या केंद्रमध्येही एमबीबीएसची पदवी लावून वैद्यकीय व्यवसाय करत होता. याबाबत फिर्यादीकडे तक्रार आली होती. त्यानुसार त्यांनी संबंधित व्यक्तीच्या कागदपत्रांची पाहणी केली. त्यावेळी संबंधित व्यक्ती एमबीबीएसची बनावट पदवी दाखवून डॉक्टर असल्याचे भासवून लोकांची फसवणूक करत असल्याचे निदर्शनास आले. त्यावरुन त्यांनी बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल केला.