पत्नीचा खून करुन तिने आत्महत्या केल्याचा बनाव, पती अटकेत
![Shocking! The body of an 89-year-old mother was found hidden in the house at a cost of Rs 43 lakh](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/murder-crime.jpg)
महाईन्यूज | पुणे
दारुच्या नशेत आपल्या पत्नीचा खून करत तिने आत्महत्या केल्याचा बनाव केलेल्या पतीला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. अयोध्या कहाळे असं या पीडित महिलेचं नाव असून पतीचं नाव विजय कहाळे असं आहे. नातेवाईक आणि पोलिसांना दिलेल्या परस्परविरोधी माहितीमुळे विजय पोलिसांच्या जाळ्यात अडकला व गुन्ह्याची उकल झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दारु पिऊन घरी आल्यानंतर, विजय आणि त्याची पत्नी अयोध्या यांच्यात भांडणं झालं. भांडण टोकाला गेल्यावर विजयने आपल्या घरातील एका जड वस्तुने पत्नीच्या कपाळावर मारले. यामुळे अयोध्या बेशुद्ध होऊन खाली पडल्या, यानंतर विजयने दोरीने गळा आवळून पत्नीचा खून केला.या घटनेनंतर विजयने आपल्या नातेवाईकांना खाली पडून गंभीर जखमी झाल्यामुळे पत्नीचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. तर पोलिसांना दिलेल्या जबानीत विजयने आपल्या पत्नीने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. परस्पर विरोधी जबानी दिल्यामुळे पोलिसांनी अखेरीस आपला खाक्या दाखवल्यानंतर विजयने आपला गुन्हा कबूल केला.