To The Point : पिंपरी-चिंचवडमधील राजकारणात नवा पायंडा; पुतळ्याच्या राजकारणामुळे राजकीय सुसंस्कृपणाला गालबोट!
सर्वसामान्य पिंपरी-चिंचवडकरांमधून व्यक्त होतेय खंत : सामाजिक संघटना, सर्वपक्षीय नेत्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
श्रीक्षेत्र देहू आणि श्रीक्षेत्र आळंदी सारख्या तीर्थक्षेत्रांचे सानिध्य लाभलेली श्रीमान महासाधू मोरया गोसावी यांची पुण्यभूमी पिंपरी-चिंववड. या शहराने आधुनिक युगाशी स्पर्धा करतानाच आपले गावपण, गावकी- भावकी, संस्कार, संस्कृती कधिही सोडली नाही. शहराच्या स्थापनेपासून गेल्या ५४ वर्षांमध्ये नगरसेवक, महापौर, आमदार, खासदार, पालकमंत्री पिंपरी-चिंचवडकरांनी पाहिले मात्र, प्रत्येकाने राजकारणातील सुसंस्कृतपणा कायम जपला. त्यामुळे शहराच्या लौकीकाला कधीही गालबोट लागले नाही.
पिंपरी-चिंचवड शहराचे राजकारण प्रलंबित प्रश्न आणि विकासाच्या मुद्यावर आतापर्यंत झाले. मात्र, आता राजकारणाची दिशा बदलली असून, पुतळ्यांचे राजकारण जोर धरु लागले आहे. शहरात आतापर्यंत लहान- मोठे ६० पेक्षा जास्त पुतळे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजर्षि शाहु महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीवीर चापेकर बंधू अशी महामानवांची यादी मोठी आहे. यासह संतसृष्टी, संत शिल्प, भक्ती-शक्ती शिल्पही उभारण्यात आली आहेत. पण, आतापर्यंत या पुतळ्यांवरुन, शिल्पांवरुन कधीही राजकारण झालेले नाही.
दिवंगत आण्णासाहेब मगर, प्रा. रामकृष्ण मोरे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, माजी महापौर मधुकर पवळे, नानासाहेब शितोळे, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, माजी आमदार विलास लांडे यांच्यासह विद्यमान खासदार श्रीरंग बारणे असतील किंवा आमदार महेश लांडगे असतील…आतापर्यंत कुणीही शहरातील पुतळ्यांचे, शहराच्या अस्मितांचे राजकारण करुन शहरात सामाजिक तेढ निर्माण होईल, अशी भूमिका राजकारणासाठी कदापि घेतली नाही.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ज्यांना निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. ज्यांनी तयारी सुरू केली आहे, अशा राजकीय महत्त्वाकांक्षी लोकांकडून छत्रपती संभाजी महाराज यांचा जगातील सर्वात उंच म्हणजे १४० फुटांचा ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’’च्या लौकीकालाच गोलबोट लावण्याचा प्रकार पहायला मिळतो आहे. वास्तविक, या पुतळ्याचा पिंपरी-चिंचवडकरांना अभिमान वाटायला हवा. पण, हा पुतळा आता राजकीय षडयंत्राचा शिकार झालेला आहे.
‘‘छत्रपती संभाजी महाराज यांचा जाज्ज्वल्य इतिहास नव्या पिढील समजावा. जगभरात त्याचा लौकीक व्हावा. ही संकल्पना आता मागे पडली आणि महाराज्यांच्या पुतळ्याचे राजकारण करुन माझा काय राजकीय स्वार्थ साधला जाईल?’’ हा विचार पुढे आला. मग, त्याला सोईस्कर फुंकर घालण्याचे काम सध्या सुरू आहे.
‘‘काहीही झाले तरी चालेल… खळबळ झाली पाहिजे…. शहरात मालवणसारखी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे…’’ अशा कुटील उद्देशाने छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यावरुन गलिच्छ राजकारण आत्ताच का सुरू झाले? कारण, काही लोकांना स्वत:ची राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करायची आहे… कुणाला चर्चेत रहायचे आहे.. कुणाला सोशल मीडियावर प्रसिद्ध व्हायचे आहे… शहर अस्थिर करायचे आहे.. मिनी इंडिया असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये अक्षरश: दंगली घडवायच्या आहेत का?… असा संतप्त सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
सुसंस्कृत राजकारणी ‘या’ प्रकरणापासून लांब…
‘‘कोणतातरी विषय हातात घ्यायचा आणि साप-साप म्हणून भुई धोपटायची…’’ असा पिंपरी-चिंचवडच्या राजकारणाचा पोत मुळीच नाही. किंबहुना, ‘महाईन्यूज’ च्या निरीक्षणानुसार, ‘‘पिंपरी-चिंचवडचे नाव बदनाम होईल… ’’ अशा कोणत्याही मुद्यावर येथील सुसंस्कृत राजकारण्यांनी कधीही स्वारस्य दाखवलेले दिसत नाही. म्हणून तर पिंपरी-चिंचवडच्या स्थानिक नेत्यांचे राज्यात वजन राहिले. मग, दिंवगत आमदार लक्ष्मण जगताप असोत किंवा माजी आमदार विलास लांडे असोत… खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, आमदार आण्णा बनसोडे, नव्याने आमदार झालेले अमित गोरखे, उमा खापरे अशा सत्ताधारी नेत्यांसह विरोधी पक्षातील माजी महापौर संजोग वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक राहुल कलाटे, भाऊसाहेब भोईर, योगेश बहल यांच्यासह शहराच्या राजकारणातील मातब्बर घराणे जगताप कुटुंबियांनीसुद्धा ‘पिंपरी-चिंचवडच्या प्रतिमेला गालबोट’ लागेल असा मुद्दा कधीही उपस्थित केला नाही. एखादे भाष्यसुद्धा केलेले ऐकीवात नाही… मात्र, आता छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यावर जे काही राजकीय षडयंत्र रचले जात आहे. ते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्यामुळेच सुरू आहे… आणि त्यांना साथ मिळतेय ती विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या राजकीय महत्त्वाकांक्षी नव्या पिढीतील नेत्यांची… पिंपरी-चिंचवडकर सूज्ञ आहेत त्यामुळे अशा ‘‘स्टंटबाजी’’तून काहीच हासील होणार नाही… पण, पिंपरी-चिंचवडच्या इतिहासात हा विषय ‘‘काळ्या अक्षरांनी’’ लिहीला जाईल, हे मात्र नक्की…!