दोन विद्यार्थिनींची वेश्या व्यवसायातून सुटका; दोन्ही तरुणी परदेशी नागरिक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/5-17.jpg)
मुंबई |महाईन्यूज|
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील दोन विद्यार्थिनींची वेश्या व्यवसाय करणाऱ्या दलालांच्या तावडीतून सुटका करण्यात आली आहे. दोन्ही तरुणी परदेशी नागरिक असून तुर्कमेनिस्तानच्या रहिवासी असल्याची माहिती आहे.
दोन्ही तरुणी स्टुडंट व्हिसावर पुणे विद्यापीठात शिक्षण घेत होत्या. मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदेश रेवले यांनी सेक्स रॅकेटवर कारवाई करत दोघींची मुक्तता केली. एकूण तीन मुलींची सुटका करण्यात आली असून त्यापैकी एक भारतीय आहे.
वेश्या व्यवसाय करणारा 26 वर्षीय नावेद अख्तर आणि 22 वर्षीय नाविद सय्यद या दोघा दलालांना अटक केली आहे. तर वेश्या व्यवसाय करणारी महिला फरार झाली आहे.
वर्सोवा येथील एका फ्लॅटमध्ये सुटका झालेल्या मुलींना ठेवण्यात आलं होतं. पोलिसांनी बोगस गिऱ्हाईक पाठवून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. प्रत्येक मुलीच्या बदल्यात दलाल 40 हजार रुपये घेत असल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील अंधेरी पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चारच दिवसांपूर्वी मुंबई क्राइम ब्रांचच्या समाजसेवा शाखेने धाड टाकून हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. अंधेरीमधील एका थ्री स्टार हॉटेलमध्ये हे सेक्स रॅकेट सुरु होतं. पोलिसांनी धाड टाकून महिलेला अटक केली, तर तीन महिला कलाकारांची सुटका करण्यात आली.