तब्बल अडीच वर्षाने जाळ्यात अडकले आरोपी ; पुण्यातील घटना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/murder-mystery.jpeg)
पुणे | महाईन्यूज
कोंढव्यातील शिवनेरीनगर येथील पारसी मैदानात पडीक जागेत पोलिसांनी एका मृतदेह सापडला होता़. पोलिसांनी अकस्मात मृत्यु अशी तेव्हा नोंद केली होती मात्र, त्याचा पुढे काहीही धागादोरा मिळत नव्हता़, मृत्युचे कारणही समोर आले नव्हते. दरम्यान तब्बल अडीच वर्षानंतर कोंढवा पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात वसीम अजमल खान याला अटक केली आहे. त्याच्याकडे तपास पारसी मैदानात आम्ही एकाचा खुन केल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर आता दीड वर्षानंतर पोलिसांनी चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केलेली आहे.
इम्रान रौफ शेख (वय २०), अहमद आयुब खान (वय २५) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़ तर वसीम अजमल खान (वय ३०) याला यापूर्वी चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन शाहरुख ऊर्फ खड्ड्या नूर हसन खान (वय १९, रा़ शिवनेरीनगर, कोंढवा) याचा काही महिन्यांपूर्वी पूर्ववैमनस्यातून खुन झाला आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक अबुजर चाऊस यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. ही घटना कोंढव्यातील शिवनेरीनगर येथील पारसी मैदानात पडीक जागी २८ ऑगस्ट २०१७ रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली होती़. निखिल अनिल लोंढे (वय २४, रा़ जांभुळवाडी रोड, कात्रज) याचा खुन केला होता.
निखिल लोंढे हा कात्रजला घरी जाण्यासाठी पुणे स्टेशन येथील सेंट्रल बिल्डिंगजवळ रिक्षाची वाट पहात होता़. त्यावेळी या चौघांनी त्याला घरी सोडण्याचा बहाणा करुन रिक्षात घेतले़. त्यानंतर त्याला पारसी मैदानातील पडिक जागी नेले़. तेथे त्याला धमकावून त्याच्याकडील पैसे व इतर साहित्य जबरदस्तीने काढून घेत होते़. तेव्हा त्याने चौघांना विरोध केला़,त्यामुळे त्यांनी चिडून जाऊन निखिल याच्या डोक्यामध्ये दगड घालून त्याचा खुन केला़. त्यानंतर ते मृतदेह तेथेच टाकून पळून गेले होते़. या खुनाचा आता दीड वर्षांनी वाचा फुटली़. सहायक पोलीस निरीक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत.