85 वर्षाच्या वॉरिअर आजीला गृहमंत्र्यांकडून मदत

कोरोना व्हायरसने संपुर्ण जग बदलून टाकले आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे पोट भरण्यासाठी पडेल ते काम करावे लागत आहे. पुण्यातील अशाच एका वॉरिअर आजीबाईंचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पुण्यातील हडपसर येथील असल्याचे सांगितले जात आहे. लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आल्याने १४ नातवांचा सांभाळ करणाऱ्यासाठी रस्त्यावर लाठीकाठीचा खेळ करणाऱ्या ८५ वर्षाच्या आजीचा व्हिडिओ व्हायरल झालाय…त्या बांबू स्टिकने स्टंट करत आहेत, जे बघून प्रत्येकजण हैराण होत आहे. पैशांसाठी त्यांना या वयातही हे करावे लागत असल्यानं प्रत्येकाचं मन हेलावलं आहे.., नेटकरी या आजीच्या हिंमतीची आणि कौशल्याचे कौतुक करत आहेत. या आजींच नाव शांताबाई पवार असून त्या हडपसरमध्ये वैदवाडी गोसावी वस्ती येथे राहतात, त्यांची चार मुलं व सुना यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्यावर १७ नातवाची जवाबदारी आली. त्यातील तीन नातवंडांचे त्यांनी काबाड कष्ट करून लग्नही केलं. आता सध्या त्या १४ नातवांचा सांभाळ करत आहेत.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या आजींसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. भर उन्हा पावसात रस्त्यावर डोंबाऱ्याचा खेळ खेळत जगण्याची लढाई लढणाऱ्या आजींना मदतीचा हात मिळाला आहे. अगदी अभिनेते आणि अधिकाऱ्यांनीही त्यांची स्तुती करत त्यांच्या मदतीसाठी पुढे आले. काही संस्थांनीही आजींना मदतीचा हात दिलाय. अनेकांनी आजींची भेट घेऊन विचारपूस केली आणि त्यांना किराणा तसेच ताडपत्री व इतर साहित्याची मदत पोहोचवली. आजींना कसलीही अडचण येणार नाही, यासाठी सातत्याने संपर्कात राहणार असल्याचंही जागृती ग्रुपचे राज देशमुख यांनी सांगितलंय.
सोशल मीडिया आणि प्रत्यक्षात मिळालेल्या कौतुकानं आजी भारावून गेल्या आहेत. ‘करोनाच्या संकटात बाहेर पडू नको असं सगळे मला सांगत होते पण मला माझी लेकर जगवायची होती. मला बाहेर पडणं भागचं होतं. मी बाहेर पडले आणि माझ्या केसालाही धक्का लागला नाहीये. माझा व्हिडिओ सगळीकडे पोहोचला आणि माझे मदतीसाठी अनेक जण पुढे आले. ज्यांनी मला मदत केली त्यांचे मी आभार मानते,’ असं त्यांनी म्हटलं आहे.
आजीच्या मदतीसाठी रितेश देशमुखसह अनेक कलाकार सरसावले आहे.रितेशनं ट्विटरवरून आपल्या चाहत्यांना आजीचा संपर्क कोणाला कुठे होतो का विचारले. अवघ्या थोड्या वेळातच रितेशला आजींचा संपर्क मिळाला. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या आजी म्हणजे शांताबाई पवार यांची भेट घेतली आणि आजींना मदतही केली. अनिल देशमुख यांनी शांताबाई पवार यांना १ लाखाची मदत केली आहे. गृहमंत्र्यांनी आजींची आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी आजीकडे एक लाख रूपयांचा धनादेश सुपुर्द केलाय. तसेच आपच्या पक्षाकडून त्यांनी हवी ती मदत केली जाईल. असे यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. या आजींचं या वयातही असं संकटासमोर पदर खोचून लढण खरोखरचं कौतूकास्पद आहे,.. आणि त्यांच्या यांच हिमंतीची दाद देत त्या आता एका स्टारपेक्षा कमी नाहीत.





