रेव्ह पार्टी प्रकरणाच्या वैद्यकीय अहवालावर खडसेंना संशय; देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कोणी गडबड केली तर…”

Devendra Fadnavis : पुण्यातील खराडी परिसरातील एका सोसायटीत रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांनी रविवारी छापा टाकत मोठी कारवाई केली. या प्रकरणात रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांनाही अटक करण्यात आली. प्रांजल खेवलकर यांच्यासह एकूण सात जणांना अटक करण्यात आली. तसेच या कारवाई दरम्यान कोकेन, गांजासह आदी अमली पदार्थही जप्त करण्यात आल्याचं सांगितलं जातं
दरम्यान, या रेव्ह पार्टी प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. मात्र, या प्रकरणाच्या वैद्यकीय अहवालावर आमदार एकनाथ खडसे यांनी संशय व्यक्त केला. अल्कहोलचा रिपोर्ट समोर आला असेल तर मग ड्रग्सचा रिपोर्ट आतापर्यंत समोर का आला नाही? यात काही काळंबेरं सुरू आहे का? असा संशय येत असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं होतं. दरम्यान, आता रेव्ह पार्टी प्रकरणावर आणि एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलेल्या संशयाबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. वैद्यकीय अहवालात कोणीही काही गडबड केली तर त्याच्यावर कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. तसेच या प्रकरणाला कोणीही राजकीय रंग न देण्याचं आवाहनही त्यांनी केलं.
रेव्ह पार्टी प्रकरणावरील वैद्यकीय अहवालाबाबत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलेल्या संशयावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मी दुपारी सांगितलं की पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणाबाबत मला कोणतंही राजकीय वक्तव्य करायचं नाही. पोर्शे प्रकरणात आपल्याला कल्पना आहे की ज्या लोकांनी वैद्यकीय अहवालात गडबड केली होती, त्या लोकांना थेट नोकरीवरून काढून टाकण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता अशा प्रकारे कोणी गडबड करेल तर त्याच्यावर नक्कीच कारवाई होईल”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा – वीर जवानांच्या शौर्याला विद्यार्थ्यांची मानवंदना!
“तसेच कोणतेही अहवाल असतील तर ते योग्य आले पाहिजेत आणि वेळेत आले पाहिजेत अशा प्रकारचा प्रयत्न विभागाचा असतो. एखादा अहवाल आधी आला आणि एखादा अहवाल नंतर आला म्हणून त्यावरून वैद्यकीय अहवालाचं मूल्यमापन करता येत नाही. तसेच माझी अपेक्षा आहे की रेव्ह पार्टी प्रकरणाला कोणीही राजकीय रंग देऊ नये, मी देखील कोणताही राजकीय रंग देऊ इच्छित नाही. त्यांनीही (एकनाथ खडसे) या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
एकनाथ खडसे यांनी काय संशय व्यक्त केला होता?
“पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणावर आता मी संपूर्ण प्रतिक्रिया देणं योग्य होणार नाही. कारण तपास सुरू आहे. त्यामध्ये आणखी काही बाबी समोर येत आहेत. मला असा प्रश्न पडतो की पोलीस यंत्रणेकडून अशा प्रकारचे व्हिडीओ प्रकाशित कसे केले जातात? पोलिसांकडून वारंवार माहिती कशी दिली जाते? एखाद्याच्या मोबाईलमधील फोटो बाहेर कसे जातात? मोबाईल पोलिसांकडे आहे, मग असं असताना हे फोटो पोलिसांकडून बाहेर जातात का? पोलीस कोणत्या कारणावरून असं करत आहेत? कोणाच्या सूचनेवरून पोलीस हे करत आहेत का?”, असे सवाल खडसे यांनी उपस्थित केले.
“या प्रकरणात दोघांनी अल्कहोल घेतल्याची बातमी मी ट्विव्हीवर पाहिली. अल्कहोलचा रिपोर्ट समोर आला असेल तर मग ड्रग्सचा रिपोर्ट आतापर्यंत समोर का आला नाही? अल्कहोलचा रिपोर्ट तुमच्याकडे येतो आणि ड्रग्सचा रिपोर्ट येत नाही? म्हणजे यात काही काळंबेरं तर नाही ना? कारण पोर्से प्रकरणात एक असं उदाहरण घडलं. ब्लडच्या रिपोर्टमध्ये फेरफार झाल्याची घटना त्या प्रकरणात झाली, त्यातील दोन डॉक्टर अद्याप तुरुंगात आहेत. त्यामुळे या प्रकरणातही अल्कहोलच्या रिपोर्टबरोबर ड्रग्सचाही रिपोर्ट यायला हवा होता. यात काय काळंबेरं आहे? या रिपोर्टमध्ये देखील तशा प्रकारचं फेरफार होऊ शकतं, असा मला संशय आहे”, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं होतं.





