आमचं ठरलंय कोणाला पाडायचं ते – आमदार सतेज पाटील
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/Satej-Bunty-Patil-Bhanamati-Kolhapur.jpg)
- भानामती करा नाही तर लिंबू-मिरची बांधा, मला काहीही फरक पडत नाही
मुंबई – माझ्या घराबाहेर लिंबू बांधा, बाहुली बांधा किंवा भानामती करा, मला काहीही फरक पडत नाही. मी असल्या फालतू गोष्टीला घाबरत नाही. आमचं ठरलं आहे, यंदाच्या निवडणुकीत कोणाला निवडून आणायचं आणि पाडायचं, अशा शब्दांत आमदार सतेज पाटील यांनी आपल्या विरोधकांना ठणकावलं आहे.
कोल्हापूरातील कसबा बावडा येथील सतेत पाटलांच्या यशवंत निवासस्थानाबाहेर भानामतीचा प्रकार आमावस्येच्या दिवशी उघडकीस आला होता. त्याच्या आधी चार दिवस काळ्या बाहुल्यावर हळदी- कुंकू व लिंबूचा वापर करण्यात आला होता. त्यानंतर सतेज पाटलांच्या घराबाहेरील झाडावर तसाच प्रकार बघायला मिळाला.
याबाबत आमदार सतेज पाटील म्हणाले की, लोकसभेची निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे भानामतीसारख्या गोष्टी आमच्या घरापर्यंत पोहचू लागल्या आहेत. तुम्ही भानामती करा, लिंबू-मिरची बांधा, काळ्या बाहुल्या बांधा… मला काहीही फरक पडत नाही. मी असल्या गोष्टींना घाबरत नाही. यंदाच्या निवडणुकीत कोणाला निवडून आणायचे हे आमचं ठरलं आहे. कोणी काहीही केले तरी आमच्यावर परिणाम होणार नाही अशा शब्दात सतेज पाटील यांनी विरोधकांना सुनावलं आहे.