breaking-newsक्रिडापुणे

Pune Sports: अभिजितदादा कदम, रुद्रप्रताप, जयनाथ मंडळ, बाणेर युवा संघाची आगेकूच

खुला गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी

कोहिनुर क्रीडा मंडळ, शिवराय स्पोर्ट्स, जयवंत क्रीडा प्रतिष्ठाण संघ पराभूत

पुणे : अभिजितदादा कदम, रुद्रप्रताप संघ सासवड, जयनाथ क्रीडा मंडळ, बाणेर युवा बाणेर या संघानी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाना पराभूत करतना कै. प्रकाश (बापू) सणस यांच्या स्मरणार्थ, सरस्वती क्रीडा संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या खुल्या गटाच्या जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत विजयी आगेकूच केली.

नातूबाग येथील मैदानावर सुरु असलेल्या लढतीमध्ये अभिजितदादा कदम संघाने कोहिनुर क्रीडा मंडळ संघाला ३४-६ असे २८ गुणांनी पराभूत करताना स्पर्धेतील आगेकूच कायम राखली. अभिजितदादा कदम संघाकडून प्रथमेश कुडले, ओंकार पाष्टे व कुणाल पवार यांनी आक्रमक चढाया करताना तर आदित्य शेळके व विशाल पारिट यांनी पकडी करताना संघाला विजय मिळावुन दिला. पराभूत संघाकडून सुमीत जाधवने लढत देण्याचा प्रयत्न केला. मध्यंतराला अभिजितदादा कदम संघाने १५-५ अशी १० गुणांची निर्णायक आघाडी घेतली होती. मध्यंतरानंतर अभिजितदादा संघाने आक्रमक खेळ करताना तब्बल १९ गुणांची कमाई केली.

बाणेर युवा बाणेर संघाने जयवंत क्रीडा प्रतिष्ठाण संघाला २१-२० असे एका गुणाने पराभूत केले. मध्यंतराला जयवंत क्रीडा संघाने ९-७ अशी २ गुणांची आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर बाणेर युवा संघाने आपला खेळ उंचावत नेला. बाणेर संघाकडून नरेंद्र साळवे, योगेश शिंगटे, विनोद चौधरी यांनी तर पराभूत जयवंत संघाकडून सिद्धांत चव्हाण, सागर पवार, मनोज शिंदे यांनी दमदार खेळ केला.

महेश जाधव व गौरव जाधव यांच्या दमदार खेळाच्या जोरावर रुद्रप्रताप संघ, सासवडने शिवराय स्पोर्ट्स शेल पिंपळगाव संघाला २२-१४ असे आठ गुणांनी पराभूत करताना स्पर्धेतील आगेकूच कायम राखली. मध्यंतराला रुद्रप्रताप संघाने ९-७ अशी केवळ दोन गुणांची आघाडी घेतली होती. विजयी रुद्रप्रताप संघाकडून महेश जाधव व गौरव जाधव यांनी आक्रमक चढाया करताना संघाच्या विजय मिळविला. पराभूत संघाकडून ऋत्विक थोरवे व करण आव्हाड यांनी चांगली लढत दिली, मात्र ते संघाला पराभवापासून वाचवू शकले नाहीत.

अटीतटीच्या लढतीत जयनाथ क्रीडा मंडळ संघाने आमराई स्पोर्ट्स संघाला १८-१४ असे ४ गुणांनी पराभूत केले. मध्यंतराला आमराई संघाने ६-५ अशी आघाडी घेतली होती. मात्र, त्यानंतर जयनाथ संघाकडून रोहन गोगावले, सागर गोऱ्हे, स्वप्नील भालेराव यांनी आक्रमक चढाई करताना संघाला विजय मिळवून दिला. आमराई स्पोर्ट्स संघाकडून आकाश सांडभोर, केतन सांडभोर यांनी दमदार खेळ केला मात्र संघाला विजय मिळवून देऊ शकले नाही.

तत्पूर्वी, काल रात्री उशीरा झालेल्या लढतींमध्ये भैरवनाथ क्रीडा संस्था भोसरी संघाने ओम साई वडगाव संघाला ३२-१८ असे पराभूत केले. मध्यंतराला भैरवनाथ संघाने १६-९ अशी आघाडी घेतली होती. भैरवनाथ संघाकडून सचिन शेलार, शिवराज जाधव यांनी पकडी तर सौरभ वानखेडे व योगेश भोसले यांनी चढाया करताना संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. पराभूत ओम साई संघाकडून राजेंद्र भोरे व आदिनाथ वाबळे यांनी लढत देण्याचा प्रयत्न केला.

सतेज संघ बाणेर संघाने वंदे मातरम कबड्डी संघाला ३४-१० असे २४ गुणांनी पराभूत केले. मध्यंतराला सतेज संघाने १५-९ अशी सहा गुणांची आघाडी घेतली होती. सतेज संघाकडून आसिफ शेख, ओंकार रणपिसे यांनी चढाया करताना गुण फलक हलता ठेवला. सतेज संघाच्या महेश नाईकने केल्या पकडींमुळे संघाला मोठा विजय साकारता आला. वंदे मातरम संघाकडून राहुल शितोळे व प्रथमेश गाडगीळ यांनी लढत दिली मात्र ते संघाला पराभवापासून वाचवू शकले नाहीत.

मोरया कबड्डी संघाने मामासाहेब मोहोळ संघाला ३३-६ असे एकतर्फी पराभूत केले. मोरया संघाने मध्यंतरालाच २५-४ अशी तब्बल २१ गुणांची बढत घेतली होती. संकेत खेडकर, शुभम जेधे व किरण कुंभार यांनी चढाया करताना मोरया संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सचिन भिंगारदिवेने पराभूत मामासाहेब मोहोळ संघाकडून लढत दिली.

अभिषेक गिरी व सिद्धेश मोरे यांच्या आक्रमक चढायच्या जोरावर पूना अमॅच्युअर्स संघाने साहिल कबड्डी संघाला ४०-१३ असे २७ गुणांनी पराभूत केले. पराभूत संघाकडून रवींद्र शेंडगे व हनुमंत भांडे यांनी लढत देण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मध्यंतराला पूना अमॅच्युअर्स संघाने २२-५ अशी १७ गुणांची आघाडी घेतली होती. ही आघाडी शेवटपर्यंत साहिल कबड्डी संघाला मोडून काढता आली नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button