breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशराजकारणराष्ट्रियसंपादकीय

“आप”ने खुणावले, आता महाराष्ट्रात येऊ का ‘झाडू’ मारायला?

  • सुनील आढाव
    कार्यकारी संपादक

    देशाची राजधानी दिल्ली आणि पंजाबमध्ये आपला झेंडा फडकवल्यानंतर आता आम आदमी पक्ष मुंबईसह महाराष्ट्रातील इतर महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढणार आहे. महापालिका निवडणुकीचे वारे सध्या राज्यात वाहत आहे. मुंबई, पुण्यासाठी राज्यातील महत्वाच्या महापालिका निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यादृष्टीने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सत्ताधारी शिवसेनेसह, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेही जोरदार तयारी सुरु केल्याचे पाहायला मिळत आहे. तर भाजपही आक्रमक पवित्रा घेत शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवताना दिसून येत आहे. अशावेळी देशाची राजधानी दिल्ली आणि पंजाबमध्ये आपला झेंडा गाडल्यानंतर दिल्ली महापालिकेवर दीड दशकानंतर आपने झेंडा फडकविला आहे. आता केजरीवालांनी अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत. महाराष्ट्रात ‘येऊ का झाडू मारयला?’ दिल्लीत आपने करून दाखवलं… 15 वर्षांच्या भाजपच्या सत्तेला खिंडार पाडले आहे. आम आदमी पक्ष मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढणार आहे. तर ‘दिल्ली बदली अब मुंबई की बारी…’ असा नारा आपने दिला आहे. केवळ 10 वर्षांच्या आपने हे सगळं करून दाखवलं… महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष का करू शकत नाहीत. कारण आपले राजकारणी नको त्या मुद्द्यांवरून गाजताहेत… भोंगा वाजतोय… अन् नेता गाजतोय…

दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाने कमाल केली आहे. पंधरा वर्षांपासून दिल्ली महापालिकेवर सत्ता असणाऱ्या भाजपला हरवून आम आदमी पक्षाला बहुमत मिळाले आहे. या निवडणुकीत मुख्य लढत आप, भाजप आणि काँग्रेसमध्येच होती. भाजपने कडवी लढत दिली आहे. तर काँग्रेसला दुहेरी आकडा गाठण्यासाठी कष्ट करावे लागले.
सीएमडी विजयानंतर अरविंद केजरीवाल दिल्लीवासियांना संबोधित करते वेळी म्हणाले…सकारात्मक राजकारण करा, नकारात्मक राजकारण करू नका, असा मोठा संदेश दिल्लीच्या जनतेने आज दिला आहे. आम्ही शिवीगाळ करत नाही, आम्ही भांडत नाही.आज जनतेने भ्रष्टाचारमुक्तीची जबाबदारी दिली आहे, उद्याने स्वच्छ करण्याची जबाबदारी आहे. या विश्वासाचे ऋण मी कधीच फेडू शकणार नाही. हे काम मी रात्रंदिवस पूर्ण करेन. हा आमचा प्रयत्न असेल. निवडणूक जिंकण्यासाठी जे करायचे होते ते आम्ही केले, आता आम्ही सर्व मिळून दिल्ली ठीक करू. मी भाजपचे सहकार्य घेणार असून काँग्रेसकडूनही सहकार्य घेणार आहे. ज्यांनी आम्हाला मतदान केले त्यांचे आभार, पण ज्यांनी मतदान केले नाही, त्यांची कामे आधी करून घेऊ. केजरीवांची भूमिका गुलाल तिकडे चांगभलं अशी मूळीच नाही. सर्वांना सोबत घेऊन, परस्परांमध्ये मतभेत असलेल्यांचे सर्वप्रथम एकमत करून विकासाच्या मुद्द्यांवर वाटचाल करण्याची ही पद्धत महाराष्ट्रातील राजकारणी का अंमलात आणत नाहीत… हा देखील यक्षप्रश्न आहेच…

मुंबई महापालिकेचा कार्यकाळ संपला असला तरी अद्याप निवडणूक जाहीर झालेली नाही. अशावेळी आम आदमी पक्षाने उमेदवार निवडीला सुरुवात केलीय. तसंच सोशल मीडियातून प्रचारही सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. दिल्लीत केलेल्या विकासाचा मुद्दा घेऊन आप मुंबई महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. महापालिकेच्या सर्व 236 जागा लढवण्याचा आपचा विचार आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात केली आहे. पुण्यातील सर्व जागांवर तरुण, उच्चशिक्षित उमेदवार. नवे फ्रेश चेहरे. सर्वसामान्यांसाठी काम करणारा पक्ष म्हणून मिळविलेली लोकप्रियता. देशाच्या राजधानीत दिल्लीत सत्तेवर मांड ठोकलेला आम आदमी पक्ष (आप) आता प्रथमच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत निवडणुकीच्या रिंगणातदेखील उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘आप’चा झाडू पुण्यात कोणत्या पक्षाला साफ करणार, याचीच उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यातील निवडणूक मुख्यत्वे भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात होणार असली, तरी आप, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांचे उमेदवार अनेकांची गणिते बिघडविणार आहेत.

स्वच्छ चारित्र्य आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीवर नसलेले उमेदवार देण्यावर आपचा भर असतो. त्यामुळे चांगलं शिक्षण झालेला आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेला उमेदवार आपकडून देण्यात येतो. आपने उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासही सुरुवात केलीय. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सर्व ताकदीने उतरणार आहे.  मुंबई महापालिकेतही शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे तिन्ही पक्ष एकत्र लढणार की स्वतंत्र अशी चर्चा होती. मात्र मुंबई काँग्रेसची धुरा हाती घेतल्यानंतर भाई जगताप यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढू शकतात. मात्र अंतिम निर्णय काय होतो हे येत्या काळात स्पष्ट होईल. महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांमध्ये आपापसामध्येच मतभेद आहेत. नेहमीच नको त्या मुद्द्यांवरून तू तू – मैं  मैं सुरू असते.

दुसरीकडे शिवसेनेशी काडीमोड घेतल्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपने शिवसेनेची मुंबई महापालिकेतील सत्ता उलथवून टाकण्यासाठी मिशन मुंबई हाती घेतलं आहे. मुंबई मनपावर भाजपचा भगवा फडकवण्याचा निर्धार विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. शिवसेनेच्या नाकावर टिच्चून महानगरपालिकेची आगामी निवडणूक जिंकायचीच, असा चंग यंदा भाजपने बांधला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नवीन झेंड्याचे अनावरण आणि शिवसेना आणि भाजप यांचा काडीमोड झाल्यापासूनच मनसे-भाजप युतीच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठींनंतर या चर्चांना हवा मिळत असे. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी मनसे-भाजप युती होणार नसल्याचे स्पष्ट केलं होतं. तर प्रवीण दरेकर यांनी गरज पडल्यास युती करण्याची तयारी दाखवली होती. सकारात्मक राजकारण करा, नकारात्मक राजकारण करू नका, असा मोठा संदेश दिल्लीच्या जनतेने महानगर पालिकेच्या निवडणूकीनंतर दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button