TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपुणे

पुणेकरांना पावसाचा धसका!

पुणे : पुणे शहर आणि परिसरामध्ये बुधवारीही (१९ ऑक्टोबर) साडेनऊच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाल्याने पुणेकरांनी त्याचा चांगलाच धसका घेतला. सोमवारी (१७ ऑक्टोबर) रात्री झालेल्या विक्रमी पावसाने शहरात दाणादाण उडवून दिल्याची स्थिती ताजी असताना बुधवारीही तशीच स्थिती निर्माण होण्याची शक्यता दिसत होती. मात्र, अर्ध्या तासानंतर पावसाचा जोर ओसरला. शहरावर मोठ्या प्रमाणावर ढग जमा झाले असल्याने रात्री उशिरापर्यंत काही भागांत पावसाच्या हलक्या सरी कायम होत्या.

पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरासह जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये सोमवारी रात्री साडेनऊनंतर तब्बल तीन तास अतिवृष्टी झाली होती. तीन तासांतच शहरात १०५ ते १३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अवघ्या काही वेळातच शहरातील सर्व रस्ते पाण्याखाली गेले. घरे, सोसायट्यांमध्ये पाणी शिरले, अनेक ठिकाणी झाडे, भिंती कोसळण्याच्या घटना घडल्या. रात्री अनेक नागरिक शहराच्या विविध भागांत अडकून पडले. काही भागांत वीजही गायब झाली. या पावसाने संपूर्ण शहरात धुमाकूळ घातला. गेल्या अकरा वर्षांतील हा पुण्यातील विक्रमी परतीचा पाऊस ठरला. मंगळवारी (१८ ऑक्टोबर) शहरात सकाळी पावसाची मोठी सर आली होती. त्यानंतर तुरळक भागांत किरकोळ पाऊस झाला.बुधवारी (१९ ऑक्टोबर) सकाळपासून पावसाळी वातावरण दिसत नव्हते. दुपारी काही भागांत ऊन पडले होते. संध्याकाळपर्यंत पावसाळी स्थिती दिसत नव्हती. मात्र, रात्री पुन्हा सोमवारप्रमाणे आकाशात मोठे ढग निर्माण झाले. त्यामुळे घराबाहेर असलेल्या नागरिकांनी तातडीने घरचा रस्ता धरला. सोमवारी सुमारे ११ किलोमीटर उंचीचे ढग होते. त्यातून पडलेल्या पावसाने शहरात धुमाकूळ घातला. बुधवारीही ७ ते ९ किलोमीटरपर्यंतचे ढग शहरातील आकाशात होते. मात्र, ते विरळ स्वरूपात असल्याने साडेनऊ ते दहा या वेळात पावसाची जोरदार सर बरसली. त्यानंतर जोर कमी झाला. मात्र, दोनच दिवसांपूर्वी झालेल्या धुवाधार पावसाची आणि त्यामुळे उडालेली दाणादाण लक्षात घेऊन या पावसाचा पुणेकरांनी धसका घेतला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button