Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

शिवसैनिकांकडून एकनाथ शिंदे यांना जाहीर पाठिंबा; ‘लोकांचा लोकनाथ एकनाथ’

 ठाणे: ‘आम्ही शिंदे समर्थक’, ‘शिंदे साहेब आम्ही तुमच्या पाठिशी आहोत’, ‘शिंदे साहेब आगे बढो, हम आपके साथ है’, ‘वाघ एकला राजा’ अशा फलकांनी ठाणे, कळवा, कल्याण-डोंबिवली परिसरातील चौकांमध्ये शिवसैनिकांकडून ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर पाठिंबा व्यक्त होण्यास सुरुवात झाली आहे. शिंदे यांच्या बंडानंतर तत्काळ कोणतीही भूमिका व्यक्त झाली नसली तरी २४ तासांनंतर शिंदे समर्थक, शिवसैनिक, पदाधिकारी आणि काही नगरसेवक शिंदे यांना पाठिंबा देण्यास मैदानात उतरले. एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. युवा पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांना समर्थन दर्शवण्यासाठी त्यांच्या बंगल्यासमोर पाठिंब्याचे पोस्टर झळकावले. शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिकांची संख्या वाढत आहे.

ठाण्यातील शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी शिवसेनेच्या आमदारांसह सुरतमध्ये ठाण मांडले होते. त्यामुळे राज्यामध्ये राजकीय भूकंप झाला असला तरी त्यावर कोणत्या प्रतिक्रिया द्यावी याविषयी शिवसैनिकांमध्ये प्रचंड गोंधळ, अस्वस्थता होती. ठाणे शहरातील शाखा, पक्ष कार्यालये, आनंदाश्रम आणि महापालिकेच्या परिसरातही शुकशुकाट होता. अखेर बुधवारी सकाळपासून ठाणे शहरातील महत्त्वाच्या नाक्यांवर, चौकांमध्ये आणि मोक्याच्या ठिकाणी शिंदे समर्थकांकडून फलक लावण्यास सुरुवात झाली होती. समाज माध्यमांवरही शिंदे यांच्या भूमिकेस समर्थन व्यक्त होऊ लागले. कळवा नाक्यावरील जाहीर फलकांवर शिंदे यांच्या समर्थकांनी फलक लावून ‘आम्ही शिंदे समर्थक’, अशी जाहीर भूमिका घेतली. या फलकांवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या छायाचित्रांना स्थान देण्यात आले होते. शिवसेनेच्या इतर कोणत्याही नेत्यांची छायाचित्रे फलकांवर लावण्यात आलेली नव्हती.

‘शिंदे’साहेब निर्णय घेतली त्याला पाठिंबा

ठाण्यातील शिवसैनिकांना एकनाथ शिंदे यांनी नेहमीच सहकार्य केले आहे. त्यांच्या मदतीसाठी धावून आले असल्याची भूमिका यावेळी शिंदे समर्थक शिवसैनिकांनी व्यक्त केली. आमच्या मदतीसाठी एका हाकेवर धावून येणारा नेता म्हणजे एकनाथ शिंदे असल्याचे देखील शिवसैनिकांनी सांगितले. त्यामुळे आम्ही एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक असून शेवटच्या क्षणापर्यंत एकनाथ शिंदे यांच्या बाजूने उभे राहून तर ते जो निर्णय घेतील त्याला आमचे समर्थन असल्याचे शिंदे समर्थकांकडून सांगण्यात आले.

काहींचे तळ्यात मळ्यात…

काही शिवसैनिक, नगरसेवक मात्र अद्यापही तळ्यात-मळ्यात असल्याने याविषयावर बोलण्यास तयार होत नाहीत. परंतु शहरातील बहुसंख्य नगरसेवक आणि शिवसैनिक शिंदे यांना पाठिंबा दर्शवत असून त्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

कल्याण-डोंबिवलीत बॅनरची चढाओढ

मनसेमधून काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत आलेल्या शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांच्यासह सागर जेधे, दीपक भोसले, राजेश मुणगेकर या चार शिवसैनिकानी डोंबिवली पूर्वेकडे स्टेशन परिसरात बॅनरद्वारे एकनाथ शिंदे यांना दिलेल्या शुभेच्छा काही क्षणांत मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या आहेत. या बॅनरवर ‘लोकांचा लोकनाथ एकनाथ’ म्हणत ‘साहेब, तुम आगे बढो, हम आपके साथ है’ या आशयाचा मजकूर लिहिण्यात आला आहे.कल्याण पूर्वेतदेखील नगरसेवक महेश गायकवाड यांनी अनाथाचा नाथ एकनाथ-हिंदू रक्षक, आम्ही सदैव तुमच्या सोबत असल्याचा मजकूर असलेला बॅनर लावला आहे. हळूहळू शहरात शिंदे समर्थक लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिकांचे बॅनर वाढत असल्याचे दिसत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button