breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

लोकसंवाद : भोसरीच्या कुस्ती आखाड्यात ‘पॉलिटिक्स वुईथ रिस्पेक्ट’चा प्रत्यय

सर्वपक्षीय नेते-पदाधिकाऱ्यांनी गावची प्रतिष्ठा अन् स्वाभिमान जपला

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
‘‘बारा गावे दुसरी, तर एक गाव भोसरी…’’अशी म्हण पंचक्रोशीत अनेकदा ऐकायला मिळते. भोसरीच्या मातीत राजकारण आणि कुस्तीची पाळेमुळे अगदी घट्ट रोवली आहेत. गेल्या दोन वर्षांत कोविडमुळे गाव-गावची संस्कृती आणि परंपरा असलेला ग्रामदैवत श्री. भैरवनाथ उत्सव साजरा झाला नाही. यावर्षी मात्र, कोविडचे काळे ढग बाजूला झाल्यामुळे भोसरीकरांनी उत्सव- यात्रा साजरी करण्याचे निश्चित केले.
कामगार नगरी, उद्योगनगरी, बेस्ट सिटी, स्मार्ट सिटी अशी वाटचाल करणाऱ्या पिंपरी-चिंचवडमधील भोसरी गावात आजही वडीलधाऱ्यांचा मान-सन्मान आणि प्रतिष्ठा जपली जाते. ‘‘गाव करील ते राव काय करील…’’ असे म्हणतात ना अगदी तसेच. उत्सव किंवा गावाच्या बाबतीत कोणताही निर्णय घ्यायचा झाल्यास काही वरिष्ठ मंडळी एकत्र बसतात. त्यामध्ये सर्वानुमते निर्णय घेतला जातो, तो संपूर्ण गावाला मान्य असतो. गावच्या बैठकीत झाला निर्णय म्हणजे तो अंतिम…मग, राजकारण, पक्ष, गट-तट किंवा हेवेदावे याला थारा नाहीच.


उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यती आणि कुस्तीचा फड ही परंपरा कायम आहे. बैलगाडा शर्यतीवर बंदी आली. त्यानंतर ११ ते १२ वर्षे शर्यती झाल्या नाही. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना सशर्त परवानगी दिल्यानंतर यावर्षी शर्यतींचे आयोजन करण्यात आले. मात्र, अचानक शर्यती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. याला गावकी-भावकीतील विवादाचे कारण पुढे करीत राजकीय वळण देण्याचा प्रयत्न झाला. सोशल मीडियातून तशा बातम्याही होवू लागल्या. मात्र, एकाही स्थानिक ग्रामस्थाने गावकी-भावकीत वाद आहेत, असे अधिकृतपणे म्हटले नाही. याउलट, गावकी-भावकीतील विषय बाहेर कसा गेला? कोणी गावकी-भावकीत राजकारण करीत आहे का? असा संताप लांडगे, लांडे, लोंढे, गव्हाणे, गवळी, फुगे आदी मंडळींना पडला. ‘भोसरी गावात फूट… गावकी- भावकीत मतभेद’ अशी विषपेरणी करणाऱ्यांचे भोसरीकरांनी कुस्तीच्या आखाड्यात मात्र अक्षरश: थोबाड रंगवले.
कुस्ती… हा भोसरीकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. भैरवनाथाच्या उत्सवात कुस्तीचा फड भरला की भोसरीकर आखाड्यावर उत्साहाने एकत्र जमतात. यावर्षी गावजत्रा मैदानावरील वस्ताद सदाशिवराव फुगे आखाडा मैदानात जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले. अत्यंत रंगतदार झालेल्या कुस्त्या आणि गावातील एकोप्याचे दृश्य पहायला मिळाले.
भारतीय कुस्तीगीर संघटनेचे उपाध्यक्ष बाळासाहेब लांडगे, भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, वसंत लोंढे, रवी लांडगे, जालिंदर शिंदे, सागर गवळी यांच्याहस्ते कुस्त्या लावण्यात आल्या. यावेळी स्थायी समितीची माजी अध्यक्ष नितीन लांडगे, संतोष लोंढे, उत्सव समितीचे अध्यक्ष पंडित गवळी, माजी नगरसेवक विश्वनाथ लांडे, विक्रांत लांडे, योगेश लांडगे, भानुदास फुगे असे सर्वपक्षीय नेते-पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. इथे कुठला पक्ष दिसला नाही, कुठला झेंडा दिसला नाही, एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून राजकीय व्यासपीठावर दिसणारे नेते-पदाधिकारी एकमेकांच्या हातात-हात घालून कुस्तीचा आनंदही घेत होते आणि विजेत्यांना कौतुकाची थापही देत होते. यामुळे भोसरीच्या गावकी-भावकीत फुटीचे निखारे पेरणाऱ्यांचा मात्र पुरता भ्रमनिरास झाला.


मानाच्या पुरस्कारांमध्येही एकोप्याचे दर्शन…
पैलवान धीरज रानवडे आणि सागर लोहार यांच्यात लढत झाली. यामध्ये रानवडे याने कुस्ती चितपट करीत ज्ञानेश्वर लोंढे यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या भोसरी युवा सम्राटची चांदीची गटा पटकावली. कचदेव लोंढे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या भोजापूर मल्ल सम्राटाची चांदीची गदा अक्षय करपे याने पटकावली. अंकुशराव लांडगे यांच्या स्मरणार्थ दिली जाणारी चांदीची गदा पृथ्वीराज मोहोळ याने मिळवली. आखाड्यात पंच म्हणून वस्ताद किसनराव शिंदे, गणपत गव्हाणे, हिरामण लोंढे, सुरेश लोंढे, मदन गव्हाणे, लाला लांडगे यांनी कामगिरी पार पाडली. भोसरीकरांची ग्रामदैवत भैरवनाथावर प्रचंड श्रद्धा आहे. शहराच्या राजकारणाचा केंद्रबिंदू सध्यस्थितीला भोसरी आहे. मात्र, तरीही गावकी-भावकी असलेला हा बंधूभाव गावभेदी प्रवृत्तीला सूचक संदेश म्हणावा लागेल. भोसरीकरांचा हा एकोपा महाराष्ट्रातील ग्रामसंस्कृतीतील आदर्श असाच म्हणावा लागेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button