चारही शंकराचार्यांना योगी आदित्यनाथ यांचं महत्वाचं आवाहन; म्हणाले..
![Yogi Adityanath said that there is no one greater than Lord Ramachandra](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/Yogi-Adityanath--780x470.jpg)
Yogi Adityanath | २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्रमाणप्रतिष्ठा केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते निवडक व्यक्तींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. मात्र, या कार्यक्रमाला चारही पीठाच्या शंकराचार्यांनी येणार नसल्याचं कळवलं आहे. यावरून, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शंकराचार्यांना महत्वाचं आवाहन केलं आहे.
राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात शंकराचार्यांनी सहभागी झालं पाहिजे. आम्ही त्यांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण पाठवलं आहे. आज जो क्षण जवळ येऊन ठेपला आहे तो श्रेयवादाचा किंवा मान-अपमानाचा नाही. मी असेन, देशाचा सामान्य नागरिक असेल किंवा शंकराचार्य कुणीही रामापेक्षा मोठं नाही. प्रभू रामचंद्रांपेक्षा मोठं कुणीही नाही. प्रत्येक माणसाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. त्यानुसार शंकराचार्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं आहे. त्यांनी ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवू नये. त्यांनी जरुर या सोहळ्याला उपस्थित राहिलं पाहिजे, असं आवाहन योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे.
हेही वाचा – शरद पवारांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण, पण जाणार का? म्हणाले..
राम मंदिराचं बांधकाम अपूर्ण आहे तरीही प्राणप्रतिष्ठा केली जात आहे या विरोधकांच्या आरोपांनाही योगी आदित्यनाथ यांनी उत्तर दिलं आहे. अयोध्येत जे काही होतं आहे ते शास्त्रांनुसारच होतं आहे. मकर संक्रांत झाल्यानंतर सूर्याचा उत्तरायणात प्रवेश होतो. त्यानंतर अनेक शुभ मुहूर्त असतात. त्यानुसारच रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा केली जाते आहे. तसंच गाभाऱ्यात प्राणप्रतिष्ठा केली जाणं ही बाब अयोध्येत पहिल्यांदा झालेली नाही, असंही योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.