ताज्या घडामोडीराजकारणविदर्भ

महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची खासदार सुप्रिया सुळेंवर टीका

पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून या, मगच आमदारकीचे स्वप्न पाहा : अ‍ॅड. रोहिणी खडसे

जळगाव : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळेंवर टीका केल्यानंतर प्रदेशाध्यक्षा अ‍ॅड. रोहिणी खडसे-खेवलकर या चांगल्याच भडकल्या. रुपालीताई, आपण पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून या, मगच आमदारकीचे स्वप्न पाहा, असे प्रत्युत्तर अ‍ॅड. खडसे यांनी दिले आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. या पार्श्‍वभूमीवर राज्यासह जिल्ह्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. पक्षनेत्यांसह महिला नेत्यांकडूनही वार-पलटवारांचे शब्दयुद्ध छेडले आहे. रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्रिपदाचे डोहाळे लागले आहेत, अशी टीका केली होती. यावरून राष्ट्रवादीचा अजित पवार गट आणि शरद पवार गटाच्या महिला नेत्यांमध्ये वाकयुद्ध सुरू झाले आहे. शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांनी मंगळवारी अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनाच आमदारकीचे डोहाळे लागले असून, त्यांनी आधी नगरसेवक होऊन दाखवावे, असे म्हणत डिवचले.

अ‍ॅड. खडसे यांनी, सुप्रिया सुळे यांच्यामुळेच रुपाली चाकणकरांचे अस्तित्व असल्याचे सांगितले. चाकणकरांना महिला प्रदेशाध्यक्षपद असेल किंवा महिला आयोगाचे अध्यक्षपद असेल, ते दिले नसते तर आज त्यांची ओळखही त्या स्वतः तयार करू शकल्या नसत्या. सुप्रिया सुळे या सर्वांचे प्रश्‍न मांडण्यासाठी समर्थ आहेत. त्या आमच्या नेत्या आहेत. तळागाळातील गोरगरिबांसह सर्वच घटकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी सुप्रिया सुळे या मुख्यमंत्री होण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत. मात्र, रुपालीताई, तुम्हाला नक्कीच आमदारकीचे डोहाळे लागले आहेत, असे दिसते आहे. पहिल्यांदा आमदार, नगरसेवक होऊन दाखवा. त्यानंतर तुम्हाला नेत्यांवर आरोप करायला अधिकार असेल. ज्या नेत्यांनी तळागाळातील गोरगरिबांचे प्रश्‍न मांडले, त्यांच्यावर बोलणे म्हणजे आकाशात थुंकण्यासारखे आहे. ते पुन्हा तुमच्यावरच परत येणार आहे. त्यामुळे त्या भानगडीत तुम्ही पडू नका, असा सल्लाही खडसे यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button