चिंचवडवर आमचा दावा, भोसरीत अजित गव्हाणे निवडून येत नाहीत : राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार
अजित पवारांची राष्ट्रवादी ‘ॲक्शन मोड’वर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद
पिंपरी: आगामी विधानसभा निवडणुकीत पिंपरी विधानसभेतून विद्यमान आमदार अण्णा बनसोडे हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील. तसेच चिंचवड विधानसभेच्या जागेवर आम्ही दावा करणार आहोत. या मतदारसंघात राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. त्यामुळे महायुतीत ही जागा राष्ट्रवादीकडेच ठेवण्यासाठी आम्ही दावा करणार आहे, असा दावा राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
काळेवाडी येथील एका हॉटेलमध्ये युवा नेते पार्थ पवार यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार अण्णा बनसोडे, माजी महापौर योगेश बहल, मंगला कदम, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, माजी नगरसेविका वैशाली काळभोर, माजी नगरसेवक मयूर कलाटे, निलेश पांढारकर, फजल शेख, युवक शहाराध्यक्ष शेखर काटे, गोरक्ष लोखंडे, विजय लोखंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पार्थ पवार म्हणाले की, पिंपरी- चिंचवड शहरात आधीपासूनच मी सक्रिय होतो. पक्षाचे अनेक जण सोडून गेले आहेत. लोक आपल्या सोबत आहेत की नाही, याची पाहणी करतो आहे, असे पार्थ पवार म्हणाले. पुढे ते म्हणाले, शहराध्यक्ष पदाबाबत अजित पवार हे अंतिम निर्णय घेतील. शहराला राज्यपाल नियुक्त आमदार मिळावा ही माझी इच्छा आहे. पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादीचा पूर्वीचा बालेकिल्ला आहे. मला आमदार किंवा खासदार व्हायचं नाही. पक्षवाढीसाठी प्रयत्न करत राहणार आहे.
अजित गव्हाणेंनी चुकीचा निर्णय घेतला…
अजित गव्हाणे यांनी चुकीचा निर्णय घेतला आहे. ते निवडून येतील असे मला वाटत नाही. तसेच, पिंपरी विधानसभेतून अण्णा बनसोडे हेच उमेदवार असतील. पण, पक्षात येण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत, असेही पार्थ पवार शेवटी बोलताना म्हणाले. भोसरी विधानसभा निवडणुकीत अजित गव्हाणे इच्छुक आहेत. त्यासाठी त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. मात्र, भोसरीतून गव्हाणे निवडून येणार नाहीत, भाजपाचे आमदार महेश लांडगे यांच्यासमोर त्यांचा निभाव लागणार नाही, असे चित्र निर्माण झाले आहे.





