उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? चंद्रहार पाटील यांच्या ट्विटची चर्चा; म्हणाले, “मला ऑफर…”

Chandrahar Patil : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक बड्या नेत्यांचे राज्यभरात दौरे वाढल्याचंही पाहायला मिळत आहे. मात्र, ऐन आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत असल्याचं दिसून येत आहे. आता ठाकरे गटाचे नाशिकमधील नेते सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा रंगली होती. त्यानंतर बडगुजर यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत शिवसेना (ठाकरे) पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली.
यानंतर आता डबल महाराष्ट्र केसरी असलेले आणि सांगली लोकसभेची निवडणूक ठाकरे गटाकडून लढलेले चंद्रहार पाटील हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी चंद्रहार पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. यानंतर मंत्री संजय शिरसाट यांनी देखील चंद्रहार पाटील यांच्या पक्ष प्रवेशाबाबत सूचक भाष्य केलं होतं. त्यामुळे चंद्रहार पाटील हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला.
हेही वाचा – ..म्हणूनच आम्ही मनसेला साद दिली; आदित्य ठाकरेंचं सूचक विधान
दरम्यान, त्यानंतर आता चंद्रहार पाटील यांनी या संदर्भात एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये चंद्रहार पाटील यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना (शिंदे) पक्षातील पक्षप्रवेशाबाबत अद्याप अधिकृत भूमिका घेतली नसल्याचं चंद्रहार पाटील यांनी म्हटलं आहे. मात्र, शिवसेना शिंदे गटाकडून पक्ष प्रवेशाबाबत आपल्याला ऑफर असल्याचंही चंद्रहार पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करायचा की नाही? याचा निर्णय आपण आपल्या सहकाऱ्यांशी बोलून घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
“माझ्या पक्षप्रवेशाबाबतीत मी अधिकृत भूमिका घेतली नाही. शिवसेना शिंदे गटाकडून पक्ष प्रवेशाबाबत मला ऑफर आहे. पक्षप्रवेश करायचा आणि पक्ष सोडायचा याबाबतचा निर्णय अजून घेतला नाही. सध्या मी बाहेर गावी असून माझ्या सहकाऱ्यांसोबत बोलून पुढील निर्णय घेईन”, असं चंद्रहार पाटील यांनी म्हटलं आहे.