..म्हणूनच आम्ही मनसेला साद दिली; आदित्य ठाकरेंचं सूचक विधान

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे व शिवसेना (ठाकरे गट) एकत्र येण्याबाबत सूचक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही युतीला प्रतिसाद दिला होता. आता उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि आमदार आदित्य ठाकरे यांनीही मनसे-शिवसेना युतीबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्र हितासाठी आपण कोणत्याही पक्षाबरोबर एकत्र यायला तयार आहोत, म्हणूनच आम्ही मनसेला साद दिली आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे म्हणाले, की आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिला आहे. आमची भावना व्यक्त केली आहे. मराठी माणूस व महाराष्ट्राच्या हितासाठी जो कोणी आमच्या बरोबर यायला तयार असेल आम्ही त्यांना बरोबर घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू. काल परवा आमचे नेते दीपेश म्हात्रे व मनसेचे नेते राजू पाटील यांनी एकत्र येऊन आंदोलन केलं. हे त्याचंच उदाहरण आहे. लोकांच्या मनात काय आहे हे आम्हाला माहिती आहे आणि आमचं मन देखील साफ आहे. जो कोणी नेता महाराष्ट्र हितासाठी आमच्याबरोबर यायला तयार असेल, जो पक्ष पुढे येत असेल, आम्ही त्यांच्याबरोबर एकत्र येऊन लढू.
हेही वाचा : आरसीबीच्या ऐतिहासिक विजयानंतर बंगळुरूत भव्य विक्ट्री परेड; कधी व कुठे? जाणून घ्या..
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही याबाबत भाष्य केलं आहे. संजय राऊत म्हणाले, युतीच्या चर्चेवर कोणीही मौन बाळगलेलं नाही. स्वतः मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या मनातली इच्छा व्यक्त केली आहे, त्यांच्या सहकाऱ्यांनी नव्हे. राज ठाकरे यांच्या इच्छेवर त्यांचे बंधू उद्धव ठाकरे यांनी देखील अनुकूल भूमिका घेतली आहे. त्यानंतर आम्ही सर्वांनी देखील योग्य भूमिका घेतल्या आहेत. त्यामुळे तुमच्या सर्वांच्या मनातली बातमी तुम्हाला लवकरच कळेल.