इंद्रायणीनगर- भोसरी प्रभाग-8 मध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार कोण?
मिशन- PCMC: माजी आमदार विलास लांडे यांच्या भूमिकेकडे लक्ष
पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी । पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते माजी आमदार विलास लांडे यांचे ‘होमपिच’ असलेल्या इंद्रायणीनगर- भोसरी प्रभाग- 8 मधून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण असेल? अशी राजकीय चर्चा जोर धरु लागली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक रणसंग्रामाचा शंखनाद सुरू झाला असून, उमेदवारी निश्चितीची जोरदार रस्सीखेच सुरू आहे. महानगरपालिका प्रभाग क्रमांक 8 मधून माजी आमदार विलास लांडे यांच्या सौभाग्यवती आणि माजी महापौर मोहीनी लांडे आणि मुलगा विक्रांत लांडे यांनी निवडणूक लढवली आहे. 2017 च्या निवडणुकीत विक्रांत लांडे या प्रभागातून निवडून आले होते.
दरम्यान, 2017 ते 2024 या काळात शहरासह राज्यातील राजकारणात मोठे फेरबदल झाले. विधानसभा निवडणुकीत लांडे परिवार शरद पवार गटात दाखल झाला होता. त्यानंतर पुन्हा अजित पवार यांच्यासोबत त्यांनी जुळवून घेतले आहे. आता महापालिका निवडणुकीत विक्रांत लांडे मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत.
महापालिका प्रभाग क्र. 8 मध्ये जय गणेश साम्राज्य, जलवायु विहार, केद्रींय विहार, पीएमआरडीए सेक्टर १२ गृहप्रकल्प, संत नगर, महाराष्ट्र कॉलनी, इंद्रायणीनगर, खंडेवस्ती, गवळीमाथा, बालाजीनगर परिसराचा समावेश आहे. या प्रभागात अ) अनुसुचित जाती, ब) महिला ओबीसी, क) महिला सर्वसाधारण आणि ड) सर्वसाधारण असे आरक्षण आहे. त्यामुळे सर्वसाधारण गटातून विक्रांत लांडे यांना उमेदवारी घ्यावी लागेल.
विक्रांत लांडे की मोहिनी लांडे..?
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये माजी आमदार विलास लांडे यांनी शिवसेना उबाठा पक्षातील तुषार सहाणे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश करुन घेतला आहे. 2017 च्या निवडणुकीत तुषार सहाणे यांनी विक्रांत लांडे आणि सारंग कामतेकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्याचा फायदा विक्रांत लांडे यांना झाला होता. मात्र, सहाणे यांच्या प्रवेशामुळे सर्वसाधारण गटातील जागेवर त्यांनी दावा केल्याचे समजते. तसे झाल्यास लांडे कुटुंबियांना सर्वसाधारण महिला गटातील उमेदवार रिंगणात आणावा लागेल आणि राजकीय ‘फ्युचर’ असलेल्या विक्रांत लांडे यांना 2031 ची प्रतीक्षा करावी लागणार आहे. किंवा सौभाग्यवतींना उमेदवारी घ्यावी लागेल. दुसरीकडे, राजकारणातून निवृत्तीच्या वाटेवर असलेल्या माजी महापौर मोहीनी लांडे यांना पुन्हा लांडे घरण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
पराभूत मानसिकता नको, आत्मविश्वास हवा?
महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजपाने राष्ट्रवादीवादीवर अक्षरश: सर्जिकल स्ट्राईक केला. अनेक दिग्गज नेते भाजपात दाखल झाले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची मानसिकता पराभूतपणाची झाली आहे. काही झाल्यास राष्ट्रवादीला ‘‘कम बॅक’’ करता येणार नाही, असा काहींचा सूर आहे. मात्र, ‘‘मन के जिते जित…मन के हारे हार..’’ या उत्कीप्रमाणे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपासोबत आत्मविश्वासपूर्ण लढाई करावी. भाजपामध्ये इच्छुकांची संख्या जास्त असून, बंडखोरी होवू शकते आणि तसे नाही झाल्यास नाराज इच्छुक तटस्थ भूमिका घेवू शकतात. त्याचा फायदा राष्ट्रवादीला होईल. त्यामुळे माजी आमदार विलास लांडे यांनी राष्ट्रवादीसाठी ‘‘संकटमोचक’’ व्हावे लागेल, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.




