राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर प्रशांत जगताप यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

पुणे | गेल्या काही दिवसांपासून पुण्यात शरद पवार गटात सुरू असलेल्या राजकीय चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. पुण्याचे माजी महापौर आणि शरद पवार गटाचे माजी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज अधिकृतपणे काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
आज सकाळीच एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रशांत जगताप यांनी आपल्याला उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही पक्षांकडून प्रवेशाची ऑफर असल्याचे सांगितले होते. पुढील तीन ते चार तासांत अंतिम निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, अखेर दोन्ही नेत्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा : मोशीत परिवर्तनाचा नारा : “प्रश्न अनेक… उत्तर एकच – प्रा. कविता आल्हाट”
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी आमदारांसह सत्तेत सहभाग घेतला असताना, पुण्यात प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांची साथ देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी पुण्यात शरद पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी करण्याचा निर्णय झाल्यानंतर जगताप यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. ही आघाडी झाली तर पक्षाचा राजीनामा देईन, असा इशाराही त्यांनी दिला होता.
यानंतर शरद पवार गटाकडून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न झाले, मात्र आपली भूमिका ठाम ठेवत प्रशांत जगताप यांनी अखेर पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. गेल्या दोन दिवसांत ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार, याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क सुरू होते. उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री फोनवर संपर्क साधल्याचेही जगताप यांनी सांगितले होते. तरीही अंतिम निर्णय घेत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या घडामोडीमुळे पुण्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता असून, आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाकडे विशेष लक्ष दिले जात आहे.




