अर्थसंकल्पात निर्मला सीतारमन कोणत्या घोषणा करणार?
केंद्र सरकार 35 गोष्टींवर कर वाढवण्याच्या तयारीत
Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन आज त्यांचा सलग पाचवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आर्थिक पाहणी अहवालातून पुढील आर्थिक वर्षाचा म्हणजेच 2023-24 चा आर्थिक विकासाचा वेग 6 ते 6.8 टक्क्यांपर्यंतच मर्यादित राहील, असा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळे बाजारात काहीसं चिंतेचं वातावरण पसरलं आहे.
देशात काय स्वस्त होणार आणि काय महाग होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अर्थसंकल्पातील तरतूदी आणि विविध क्षेत्रांना काय मिळणार याची स्पष्टता आज दुपारपर्यंत होणार आहे.
अशातच यंदाच्या बजेटमध्ये काही वस्तूंवरच सीमाशुल्क वाढण्याची शक्यता आहे. यामुळे सरकारच्या मेक इन इंडिया मोहिमेला मदत मिळेल. तसेच स्थानिक उत्पादनालाही चालना मिळेल. सरकार 35 गोष्टींवर कर वाढवण्याच्या तयारी आहे, त्यामध्ये खासगी जेट, हेलिकॉप्टर, हाय एंड इलेक्ट्रॉनिक वस्तू, प्लास्टिकच्या वस्तू, दागिने, हाय ग्लॉस पेपर आणि व्हिटॅमिन्स यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.
हा अर्थसंकल्प समजून घेण्यासाठी वित्तीयतूट, आयकर उत्पन्न मर्यादा, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर, आर्थिकवर्ष, शॉर्टटर्मगेन, लाँगटर्मगेन हे मुद्दे लक्षात घेणे गरजेचे आहे.