नवरात्रोत्सवातील मंडप भाडे माफ करा : राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष शेखर काटे
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना मागणीचे निवेदन
पिंपरी : नवरात्रोत्सव उत्साहाचा सण आहे. या उत्सवानिमित्त शहरात उभारण्यात येत असलेल्या पत्राशेड, मंडपाचे भाडे महापालिका प्रशासनाकडून वसूल केले जाते. मात्र, गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवातही मंडप भाडे माफ करावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष श्री. अजित गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका आयुक्त श्री. शेखर सिंह यांना याबाबत निवेदन देण्यात आले. या वेळी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेविका माया बारणे, राष्ट्रवादी युवकचे कार्याध्यक्ष प्रसाद कोलते, पदाधिकारी रोहीत काटे उपस्थित होते.
निवेदनात नमूद केले आहे की, नुकताच गणेशोत्सव उत्साहात पार पडला. गणेशोत्सवात शहरातील सर्व गणेश मंडळांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन केले. त्यामुळे गणेशोत्सवात कोणतेही गालबोट लागले नाही. सणही आनंदात साजरा करण्यात आला. गणेशोत्सवात शासनाकडून देखील सहकार्य करत काही गोष्टींमध्ये सवलत देण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर आगामी नवरात्र उत्सवात शासनाकडून सहकार्य मिळावे अशी शहरातील मंडळाची अपेक्षा आहे. उत्सवानिमित्त शहरात उभारण्यात येत असलेल्या पत्राशेड, मंडपाचे भाडे महापालिका प्रशासनाकडून वसूल केले जाते. मात्र, गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवातही मंडप भाडे माफ करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.





