‘राज्यात पुढील मुख्यमंत्री काँग्रेसचाच’; विश्वजित कदम यांचं विधान चर्चेत

मुंबई | नूतन खासदार विशाल पाटील यांचा मिरज विधानसभा मतदार संघाच्यावतीने जाहीर सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी राज्यात पुढील मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल असं म्हटलं आहे. त्यांचे हे विधान सध्या चांगलेच चर्चेत आहे.
डॉ. विश्वजित कदम म्हणाले, लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांना सर्वाधिक मत्ताधिक्य मिरजेने दिले, ही निवडणुक सोपी नव्हती. ज्या पक्षात आम्ही काम करत होते त्याचे पक्षाचे तिकिट मिळत नव्हते, त्यामुळे अन्याय होत असल्याचे पाहून जनतेनेच या निवडणुकीत साथ दिली. जनतेने काँग्रेस पक्षाला आणि पक्षाच्या विचाराला साथ दिली.
हेही वाचा – पालखी सोहळाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांचे दुर्घटना प्रतिसाद प्रणालीविषयक प्रशिक्षण संपन्न
काँग्रेसचे विचार वाचविण्यासाठी जनतेने ही निवडणुक हातात घेतली. मिरज विधानसेभेसाठी कुठल्याही परिस्थितीत काँग्रेसचा झेंडा फडकला पाहिजे. जिल्ह्यात पाच आमदार काँग्रेसचे असतील आणि राज्याचा मुख्यमंत्री काँग्रेसचा असेल, असं विश्वजित कदम म्हणाले.
खासदार विशाल पाटील म्हणाले, काँग्रेस पक्षाचा विचार, वसंतदादांचे विचार धोक्यात होते परंतु मिरज मतदार संघाने भरघोस मतदान केले. मिरजकरांनी दाखवून दिले की आम्ही स्वाभिमानी आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये मिरजेत काँग्रेसचाच उमेदवार विजयी झाला पाहिजे. जातीयवादी पक्षाचा पराभव करू शकतो, बलाढ्य पक्षाचा पराभव करू शकतो असा विश्वास आला आहे. जिल्ह्यातून चार ते पाच काँग्रेसचे आमदार निवडून आले पाहिजेत.





