पीक विमा योजनेत भ्रष्टाचार, धनंजय मुंडेंची चौकशी करा; काँग्रेस नेत्याची मागणी
Dhananjay Munde | मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात मंत्रिपदावर टांगती तलवार असलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. एक रुपयात पीक विमा योजनेत भ्रष्टाचार प्रकरणी धनंजय मुंडे यांची चौकशी करण्याची मागणी माजी विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले, की महायुती सरकारने एक रुपयात पीक विमा ही योजना आणली होती, त्यावरून आपली पाठ थोपटून बीड पॅटर्नचा गवगवा केला होता. पण या योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने राज्य सरकारला ही योजना बंद करण्याची शिफारस केली असल्याचे समजते. विशेषत या योजनेत शेतकऱ्यांच्या नावे बोगस अर्ज केल्याची प्रकरण समोर आल्यानंतर ही शिफारस करण्यात आली आहे. खरीप हंगाम २०२४ मध्ये एकूण चार लाख अर्ज बोगस निघाले त्यातील एक लाखाहून अधिक अर्ज हे एकट्या बीड जिल्ह्यात आढळले आहे , ही धक्कादायक बाब आहे. त्यामुळे हा तर भ्रष्टाचाराचा बीड पॅटर्न आहे.
हेही वाचा : माथाडी कामगार व टाटा ग्रुप ऑफ कंपनी व्यवस्थापनात वेतन करार!
कृषिमंत्री असताना धनंजय मुंडे यांनी कृषी साहित्याचे खरेदीचे धोरण बदलले होते त्याबाबत उच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले आहे, तसेच बारामती येथील ऊस तोडणी हार्वेस्ट चालकांकडून सबसिडीच्या नावाखाली पैसे उकळण्याचा आरोप देखील वाल्मीक कराड वर झाला आहे, हे कराड मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे शेतकऱ्याची फसवणूकच सत्ताधारी करत असतील तर त्यांनी न्याय मागायचा कुणाकडे? यासाठी धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना त्यांनी घेतलेल्या सर्व निर्णयांची चौकशी झाली पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी यासाठी समिती नेमून लक्ष्य घातले पाहिजे? अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
बोगस अर्जावरून शेतकऱ्यांना शिक्षा देऊ नये : विजय वडेट्टीवार
एक रुपया पीक विमा प्रकरणात आता बोगस अर्जावरून शेतकऱ्यांना शिक्षा देऊ नये. मंत्र्यांच्या सूचनेशिवाय योजनेत भ्रष्टाचार होऊ शकत नाही. त्यामुळे या प्रकरणी ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असंही विजय वडेट्टीवार म्हणाले.