‘राज ठाकरेंकडून लोकसभा निवडणुकीसाठी पाठिंबा मागणार’; वसंत मोरेंचं विधान चर्चेत

पुणे | पुणे लोकसभा निवडणुकीत वसंत मोरे वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवणार आहेत. त्यांना महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा सामना करावा लागणार आहे. पुणे लोकसभेची लढत तिरंगी होणार आहे. यामुळे वसंत मोरे आता राज ठाकरे यांना भेटण्याचा प्रयत्न करणार आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा पाठिंबा मागण्याचा मी प्रयत्न करेन, असे वसंत मोरे म्हणाले. त्यांचे हे वक्तव्य आता चर्चेत आलं आहे.
वसंत मोरे म्हणाले की, पक्षाच्या एका नेत्याकडे राजसाहेबांचा फोन आला होता. मी त्यांना विनंती करून सांगितलं की, कृपया मला फोन देऊ नका. मी राज साहेबांना फसवू शकत नाही. मला माघारी परत जायचंच नाहीये. मला आग्रह करुन साहेबांसोबत बोलायला लावू नका. मला ते जमणार नाही. बोलायला जड होईल. इतकंच नाही तर, लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा पाठिंबा मागण्याचा मी प्रयत्न करेन. पण, काय करावे, हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असेल, असंही मोरे म्हणाले आहेत.
हेही वाचा – ‘जनसागराच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही’; सुनेत्रा पवार
आमचे मतभेद झालेत पण मनभेद झालेले नाहीत. मी त्यांच्या सोबत २५ वर्षे राहिलो आहे. मनसेमधून बाहेर पडल्यामुळे साहेब नाराज आहेत, पण बघू काय करतात. पुण्यात ना भाऊ, ना अण्णा, असे कोणाचे राजकारण चालणार नाही. आपलेच तात्यांचे (वसंत मोरे) राजकारण चालणार आहे. पुणेकरांचा विश्वास आपल्यावर आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीत आपण विजयी होऊ, असे वसंत मोरे यांनी सांगितले.





