पुन्हा गारपीट! पुन्हा नुकसान! अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल
![Unseasonal rains upset farmers](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/rain-2-780x470.jpg)
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात मोठ्या प्रमाणात चढ उतार होत आहे. या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. अशातच हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आजही महाराष्ट्रातील मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसासह गारपिटीचा अंदाज वर्तवला आहे. या अवकाळी पावसाचा फटका द्राक्ष, आंबा, केळी, संत्रा, काजू, हरभरा, कांदा या पिकांना बसत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
बीड जिल्ह्यात तुफान वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यानं अतोनात नुकसान झालंय. तब्बल एक तास इथं मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे शेतीपिकाचं प्रचंड नुकसान झालंय..वादळी वाऱ्यामुळे मोठ मोठी झाडं उन्मळून पडली आहेत तर काही घरावरील पत्र उडून गेले आहेत.
बीड जिल्ह्यात आणि मराठवाड्यात पुन्हा अवकाळी आणि गारपीट! पुन्हा नुकसान! पंचनामे कुठपर्यंत आलेत सरकार सांगेल का? अवकाळी आणि गारपीटीने झालेल्या नुकसानीची भरपाई तात्काळ घोषित करा मायबाप सरकार.., असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला केलं आहे.
दरम्यान, हवामान विभागाने राज्यभरात ७ ते १० एप्रिलदरम्यान वादळी पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, उत्तर महाराष्ट्रात १० एप्रिलपर्यंत गारपिटीसह जोरदार पाऊस होईल.