पंतप्रधानांच्या भेटीपूर्वी रात्री उशिरापर्यंत उद्धव ठाकरेंची पवारांशी चर्चा
![Uddhav Thackeray to meet PM in Delhi today; Ajitdada, Ashok Chavan also accompanied](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/4ef57a80-f2be-11ea-97.jpg)
मुंबई – मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकारण तापलेले असताना आणि कोरोना संकटात जनता होरपळत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज सकाळी 11 वाजता राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर ते आज पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींची प्रत्यक्ष भेट घेणार असल्याने या भेटीत काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. दरम्यान, या भेटीपूर्वी सोमवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांचे सरकारी निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर काल रात्री उशीरापर्यंत ही बैठक सुरू होती.
दरम्यान, मंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना या बैठकीबाबत सांगितले, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत मराठा आरक्षणाविषयी चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत होणाऱ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव यांनी पवारांची भेट घेतली. महाराष्ट्राचे एक शिष्टमंडळ मोदींची भेट घेणार आहेत. या शिष्टमंडळात मुख्यमंत्री, उप-मुख्यमंत्र्यांबरोबरच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांचा समावेश असून ८ जून रोजी ते मोदींची भेट घेणार आहेत.’