..तर मुख्यमंत्रीही विकृत मानसिकतेचे; बदलापूर प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई | बदलापूरमधील आदर्श शिक्षण संस्थेतील शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणावर आता राजकारण तापले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलापूरमध्ये आंदोलन करणारे राजकीय कार्यकर्ते होते, असा आरोप केल्यानंतर आता शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन महायुती सरकारवर टीका केली. तसेच, राज्यभरात या घटनेचा निषेध होत असताना मुख्यमंत्री शिंदे कुठे होते? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, अशा विकृतीचा निषेध नव्हे तर त्याचा बंदोबस्त करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वांना, माता-भगिनींना २४ ऑगस्टच्या बंदमध्ये सामील होण्याचे आवाहन करत आहे. शाळेत जर मुली सुरक्षित नसतील तर ‘मुलगी शिकली, प्रगती झाली’, या वाक्याला काय अर्थ राहिला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. माझ्या माता-भगिनी सुरक्षित राहिल्या पाहिजेत, ही भूमिका सर्व राजकीय पक्षांची असली पाहीजे.
हेही वाचा – जनता फक्त निवडणूकीची वाट पाहतेय; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ‘आप’चा पाठिंबा
सध्याचे मुख्यमंत्री हे घटनाबाह्य आहेत. त्यांच्या अकलेच्या दिवाळखोरपणाबद्दल मी बोलणार नाही. परंतु, ज्या प्रमाणे निवडणूक डोळयासमोर ठेवून जनतेचा पैसा जनतेला देण्यासाठी योजना आणली. तशी ही योजना नव्हती. हे दुष्कृत्य आहे. त्यात राजकारण आणलं जात आहे असं घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर ते सुद्धा विकृत मानसिकतेचे आहेत. ज्यांना ज्यांना दुष्कृत्या मागे आणि निषेध करण्यामागे राजकारण आहे असं वाटतं ते सर्व विकृत आहेत. ते सर्व या नराधमांचे पाठिराखे आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
कोलकातामध्ये बलात्काराच्या घटनेनंतर देशभरात आगडोंब उसळला. अनेक घटना जेव्हा लागोपाठ घडतात, तेव्हा जनक्षोभाचा उद्रेक होतो. या जनक्षोभात कोणत्याही राजकीय पक्षाचा हात नाही. महाराष्ट्रात अशा विकृतांना कठोर शिक्षा होते, हा संदेश गेला पाहीजे, यासाठी आम्ही बंद पुकारला आहे. बहीण सुरक्षित असेल तर लाडकी बहीण योजना आणता येते. २४ ऑगस्ट रोजी जात-धर्म-पक्ष बाजूला ठेवून सर्वांनी या बंदमध्ये सहभागी झाले पाहीजे, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.





