पिंपरी-चिंचवडच्या ॲडव्हेंचर मार्शल आर्ट स्कूलचा जिल्हा कराटे स्पर्धेत दबदबा; द्वितीय चषकावर नाव कोरले
जिल्हास्तरीय स्पर्धेत काता आणि कुमिते प्रकारात दमदार कामगिरी; शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला

पुणे : जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत पिंपरी-चिंचवडच्या ॲडव्हेंचर मार्शल आर्ट स्कूलने द्वितीय क्रमांकाचा मानाचा चषक पटकाविला आहे. पुणे महानगरपालिकेच्या कै. सो. बर्वे क्रीडांगणावर रविवारी (दि. 19 जुलै 2026) झालेल्या या स्पर्धेत शाळेच्या खेळाडूंनी काता आणि कुमिते या दोन्ही प्रकारांत उल्लेखनीय यश मिळवत पिंपरी-चिंचवड शहराचे नाव उज्ज्वल केले.
इंडियन मार्शल आर्ट अकॅडमी, मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध नामांकित संघांनी सहभाग नोंदविला होता. मुख्य प्रशिक्षक उमेश लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ॲडव्हेंचर मार्शल आर्ट स्कूलच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत पदक तालिकेत आघाडी घेत द्वितीय क्रमांकाचा चषक आपल्या नावे केला.
स्पर्धेचे आयोजन प्रमोद खत्री यांनी केले होते. तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक अरविंद साळवे, राजेश देवकुळे, वैष्णव महाजन आणि प्राजक्ता गायकवाड यांनी नियोजनाची जबाबदारी सांभाळली. स्पर्धेसाठी पंच म्हणून उमेश लोंढे यांनीही जबाबदारी पार पाडली.
हेही वाचा – पुणेरी मेट्रोत स्मार्ट तिकीट व्यवस्थेची एंट्री; WhatsApp QR ते NCMC कार्डपर्यंत सर्व सुविधा एकाच छताखाली!
या स्पर्धेला विधान परिषदेच्या उपसभापती तथा आमदार सौ. नीलम गोऱ्हे, अॅड. सौ. गौरी छाबरिया (मुंबई) आणि अध्यक्ष श्री. सुदर्शन साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
स्पर्धेतील संघांच्या क्रमवारीत पुणे ग्रामीणच्या होयसंग तायक्वांदो अकादमीने प्रथम क्रमांकाचा चषक पटकाविला, तर पिंपरी-चिंचवडच्या ॲडव्हेंचर मार्शल आर्ट स्कूलने द्वितीय आणि पुणे शहरातील युथ स्पोर्ट क्लबने तृतीय क्रमांक मिळविला. याशिवाय, पुणे दक्षिणच्या इंडियन कराटे क्लबला ‘सर्वोत्कृष्ट संघ’ हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पिंपरी-चिंचवडमधील खेळाडूंनी सातत्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली असून, ॲडव्हेंचर मार्शल आर्ट स्कूलच्या या यशामुळे शहरातील युवा खेळाडूंना नवी प्रेरणा मिळाली आहे.





