To The Point : वाह… रे हिंदू नेत्यांनाे… जनआक्रोश मोर्चाचे तुम्हाला वावडे पण, ‘जुलुस’मध्ये पहिल्या रांगेत!
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मतांचे गणित जुळवण्याची धडपड : बहुसंख्य हिंदूंच्या अत्याचाराविरोधात काढलेल्या मोर्चात मात्र सहभाग नाही
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
भारतीय संविधानाने या देशात सर्व जाती-धर्माच्या नागरिकांना समान अधिकार दिले आहेत. मात्र, बहुसंख्य असलेला हिंदू या देशात आता ‘तुच्छ’ समजला जातो आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्रात आणि राज्यात ‘हिंदूत्ववादी’ सरकार आहे, असा म्हटले जाते. मग, सरकारविरोधात असलेला राग काढण्यासाठी हिंदू व्यतिरिक्त सर्वधर्मीयांची एकजूट करण्यात येते. अल्पसंख्याक समाजाची मते मिळणार नाहीत, या भितीने मग हिंदू समाजाचे नेतेसुद्धा आपले ‘हिंदुत्व’ सोईस्कर विसरतात. पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या काही दिवसांतील घडमोडी पाहता ही बाब प्रकर्षाने जाणवू लागली आहे.
‘‘हिंदूच हिंदूंचे शत्रू आहेत’’ असे देशाच्या राजकारणातील प्रखर हिंदूत्ववादी नेते व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीरपणे भाषणांमध्ये सांगत होते, तशीच परिस्थिती सध्या देशात निर्माण झाली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान हजरत महम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त ‘‘ईद-ए-मिलाद’’ साजरी केली जाते. या निमित्त जमाते लतीफीया मशीद येथून पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळील पीएमपी मैदानापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. चिखली, नेहरूनगर, वाकड, भोसरी, निगडी, कासारवाडी, काळेवाडी आदी परिसरातील मंडळांनी सहभाग नोंदविला. प्रचंड गर्दी आणि उत्साहात जुलुस काढण्यात आला. अक्षरश: शक्तीप्रदर्शन झाले.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शहरातील महाविकास अघाडीतील इच्छुकांनी या जुलुसमध्ये सहभाग दर्शवला. काहींनी अन्न, पाणी अशी सेवाही प्रदान केली. काही इच्छुकांनी बॅनरबाजी केली. काहींनी जुलुसचे ठिकठिकाणी भव्य स्वागत केले. यात गैर असे काहीच नाही. हिंदू-मुस्लिम भाई-भाई असाच विचार भारतीय संविधानाने देशवासीयांना दिला आहे. पण, धर्माने हिंदू असलेल्या या नेत्यांनी सोशल मीडियावर मात्र एकही पोस्ट केली नाही. प्रत्यक्ष सहभागावर भर दिला.
पण, काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवडमधील सकल हिंदू समाजाच्या वतीने बांग्लादेश आणि भारतातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात जनआक्रोश मोर्चा काढला होता. त्या मोर्चाकडे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते वगळता अन्य पक्षातील नेते फिरकले सुद्धा नाहीत. धर्माने हिंदू असलेले हेच मातब्बर नेते हिंदूंवरील अत्याचाराविरोधात मोर्चात सहभागी होत नाहीत. मात्र, मुस्लीम बांधवांच्या जुलुसमध्ये सहभागी होतात, असा दुटप्पीपणा पाहिला असता ‘‘ हिंदू नेत्यांना हिंदू असल्याची लाज वाटते का?’’ असा प्रश्न उपस्थित होतो. देशात सर्वधर्म समभावाचे वातावरण असावे, त्यासाठी सर्वधर्मियांनी पुढाकार घेतला पाहिजे. गुन्हेगार किंवा अत्याचारी व्यक्तीला धर्म नसतो… हीच भूमिका ‘महाईन्यूज’ होती आणि यापुढील काळातही राहील. पण, हिंदूं नेत्यांनी आपले आत्मभान विसरता कामा नये, अशी अपेक्षा आहे.
आमदार महेश लांडगे यांना जुलुसपासून बाजुला ठेवले…
प्रखर हिंदूत्ववादी भूमिका घेणारे भाजपाचे आमदार महेश लांडगे यांना जुलुस कमिटीने या उत्सवापासून बाजूला ठेवले. याबाबत ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) च्या महिला कार्याध्यक्षा रुहिनाज शेख यांनी जाहीरपणे सोशल मीडियावर जुलूस कमिटीचे आभरही व्यक्त केले आहे. त्या म्हणातात ‘‘महेश लांडगे यांना पिंपरी-चिंचवड जुलूस कमिटी आणि स्वाभिमानी मुस्लिम समाजाने आपले प्रोग्राम पासून लांब ठेवल्याबद्दल सर्वांचे आभार..’’ हिंदूंतवरील अत्याचाराबाबत आवाज उठवला म्हणून महेश लांडगे हिंदूत्ववादी झाले. राजकीय हेतुने त्यांचा द्वेश सुरू झाला. पण, ‘‘महिलांवर अत्याचार करणारा कोणत्याही जाती-धर्माचा असो… त्याला त्याच ठिकाणी ठेचून मारा… आपल्या आया-बहिनींकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांचे डोळे काढण्याची तयारी ठेवा..’’ असे आमचे हिंदूत्व सांगणारे महेश लांडगे आजच्या घडीला मुस्लिम समाजाच्या दृष्टीने ‘व्हीलन’ झाले आहेत, हे रुहिनाज शेख यांच्या पोस्टवरुन अधोरेखित होते.

हिंदू एकजूट होतील काय?
हिंदुत्ववादी भूमिका घेतली म्हणून जर मुस्लिम समाजातील राजकीय व्यक्ती आमदार महेश लांडगे यांना उत्सवापासून बाजुला ठेवत असतील, तर शहराची लोकसंख्या सुमारे ३० लाख आहे. त्यामध्ये हिंदू समाज ८० टक्के आहे. उर्वरित अल्पसंख्याक समाज आहे. मग, हिंदू महेश लांडगे यांच्यासाठी नव्हे, तर स्वत:च्या धर्माचा अभिमान म्हणून एकजुट करतील काय? किंवा हिंदू नेते हिंदुंवरील अत्याचाराविरोधात काढलेल्या मोर्चांमध्ये स्वाभिमानाने सहभागी होतील काय? असा प्रश्न आहे.
मुस्लिम समाजबांधवांची स्वागतार्ह भूमिका…
यंदा ईद-ए-मिलाद व अनंत चतुर्दशी एका पाठोपाठ आल्यामुळे मुस्लिम समाज बांधवांनी सामाजिक सलोखा राखत १६ तारखेला काढण्यात येणारी मिरवणूक १९ सप्टेंबरला (गुरुवारी) काढण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, १६ सप्टेंबरला पारंपरिक पद्धतीने ईद-ए-मिलाद साजरी करण्यात आली. तर गुरुवारी (ता. १९) शहरात उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. मुस्लिम समाज बांधवांचा हा आदर्श निश्चितच स्वागतार्ह आहे. कारण, संधीसाधु हिंदू नेत्यांनी राजकीय गणिते जुळवण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी मुस्लिम समाजाने सामाजिक भान जपत शहरातील शांतता- सुव्यवस्था कायम राहील याचा आदर्श घालून दिला.





