To The Point : छत्रपतींच्या नावाने राजकीय ‘स्टंटबाजी’ करणाऱ्यांवर खासदार डॉ. अमोल कोल्हेंचा ‘रामबाण उपचार’
छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याबाबत घेतली स्वागतार्ह भूमिका : राजकीय षडयंत्रामध्ये सहभागी न झाल्याने इच्छुकांचे मनसुबे उधळले
![To The Point: MP Dr. on those doing political stunts in the name of Chhatrapati Amol Kolhe's 'panacea treatment'](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/09/Amol-Kolhe-PCMC-780x470.jpg)
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
हिंदवी स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका अजरामर करणारे प्रगल्भ अभिनेता आणि महाराष्ट्राचा आवाज दिल्लीतील संसदभवनामध्ये बुलंद करणारे राष्ट्रवादी विचारांचे अभ्यासू खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पिंपरी-चिंचवडमधील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याबाबत राजकीय ‘‘स्टंटबाजी’’ करणाऱ्यांवर ‘रामबाण उपचार’ केला आहे. किंबहुना, पुतळ्यावरुन शहरातील कायदा-सुव्यवस्था बिघडणार नाही, याची पूर्णत: काळजी घेतली आणि या मुद्याला अक्षरश: ‘फूल स्टॉप’ दिला आहे.
मोशी येथे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून धर्मवीर संभाजी महाराज यांचा जगातील सर्वांत उंच अर्थात १४० फूटाचा ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’’ उभारण्याचे काम सुरू आहे. या पुतळ्याचे काही पार्ट येथे दाखल झाले आहेत. त्यामधील मोजडीच्या भागाला तडा गेला आणि पार्ट अस्वच्छ जागेत ठेवले आहेत, असा आरोप करीत शहरात वातावरण तापवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह प्रसारमाध्यमांतील काही मातब्बर पत्रकारांनीसुद्धा या मुद्याला ‘फुंकर’ घातली. मात्र, यामागे राजकीय षडयंत्र सुरू आहे, ही बाब कुणाच्याही लक्षात आली नाही. सदर पुतळ्याचे काम आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून होते आहे. त्यामुळे पुतळ्याच्या कामाचे श्रेय लांडगे यांना घेता आले नाही पाहिजे. किंबहुना, पुतळ्याच्या कामावरुन मालवणसारखी परिस्थिती निर्माण करायची आणि महेश लांडगे यांना राजकीयदृष्टया ‘टार्गेट’ करण्याचे हे एक षडयंत्र होते. मात्र, मुद्दा चुकाला. अभ्यास चुकला आणि इच्छुकांचे मनसुबे उधळले आहेत.
‘‘आम्हाला महाराजांच्या पुतळ्यावरुन राजकारण करायचे नाही..’’ असा दावा करणाऱ्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला भोसरीसह पिंपरी आणि चिंचवडमधील मविआचे इच्छुक उमेदवारच उपस्थित होते. ना कोणता सामाजिक कार्यकर्ता… ना कुठल्या सामाजिक संघटनेचा नेता…त्यावेळीच या प्रकरणात राजकारण सुरू आहे, ही बाब पिंपरी-चिंचवडकरांच्या लक्षात आली. विशेष म्हणजे, डॉ. अमोल कोल्हे यांनीसुद्धा सदर प्रकरणात दिशादर्शक भूमिका घेतली आहे.
डॉ. अमोल कोल्हे यांनी अक्षरश: ‘‘दिल जित लिया..!’’
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ब्रॅड सेलिब्रेटी प्रचारक खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या लोकसभा कार्यक्षेत्रात हा पुतळा उभारला जात आहे. लोकसभा निवडणुकीत एकमेव भोसरी मतदार संघात डॉ. कोल्हे यांना सुमारे १० हजार मतांची पिछाडी आहे. पुतळ्यावरुन सुरू असलेल्या राजकारणात डॉ. कोल्हे काय भूमिका घेतात. याकडे तमाम शिव-शंभू प्रेमींचे लक्ष लागले होते. कारण, भोसरीतील भाजपाचे आमदार महेश लांडगे यांना कोंडीत पकडण्याची ही नामी संधी होती. मात्र, डॉ. कोल्हे यांनी राजकारणापेक्षा सामाजिक भान आणि महाराजांच्या नावाची निष्कारण बदनामी करण्याची भूमिका टाळली. विविध मुद्यांवर प्रसारमाध्यमांशी बोलताना कोल्हे यांनी ‘‘पिंपरी-चिंचवडमधील संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाबाबत महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह आणि संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे. प्रत्यक्ष पुतळा उभारण्याचे काम सुरू झाले की स्वत: कामाची पाहणी करणार आहे. त्यावेळी माझी प्रतिक्रिया नक्की देईन.’’ या एका वाक्याने डॉ. अमोल कोल्हे यांनी तमाम शिव-शंभूप्रेमींसह पिंपरी-चिंचवडकरांचे ‘काळीज’ जिंकले आहे. महाराजांच्या नावाने राजकारण करण्याचा प्रवृत्तीला हा डॉक्टरांचा नाजूक ‘डोस’ अत्यंत रामबाण उपचार ठरला आहे.
‘महाईन्यूज’ सत्याची बाजू प्रभावीपणे मांडतच राहणार…
छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळा प्रकरणात ‘महाईन्यूज’ ने सातत्यपूर्ण खरी वस्तुस्थिती पिंपरी-चिंचवडकरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. पुतळ्याचे काम भव्य-दिव्य आणि भ्रष्टाचारमुक्त झालेच पाहिजे. या मताशी आम्ही पूर्णत: सहमत आहोत. याबाबत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. मारुती भापकर यांनी To The Point मधील मुद्यांवरुन आपली भूमिका कळवली. त्यांच्या अनुभवाचा आणि सामाजिक कार्याचा आदर आहेच. पण, भापकरांसारख्या अनुभवी व्यक्तीनेसुद्धा पुतळ्यावरुन राजकारण करावे, याची चिंता वाटते. यापुढील काळात पुतळ्यावरुन राजकीय षडयंत्र रचले जात असेल, त्यामध्ये महाराजांच्या नावाचा वापर करुन राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला जात असेल आणि पिंपरी-चिंचवडची बदनामी राज्यभरात करण्याची भूमिका कोण घेत असेल, तर त्या भूमिकेला (व्यक्तीला नव्हे) आम्ही आमच्या लेखणीतून आणि अभिव्यक्ती हक्कातून तीव्र विरोधच करणार आहोत. तुर्तास डॉ. कोल्हे यांच्याकडे महाराष्ट्रातील एक अभ्यासू खासदार म्हणून जी ओळख आहे, ती आणखी गडद झाली आहे. पुतळ्यावरुन होणारे राजकारण याला पूर्णविराम द्यावा, असे आवाहन यानिमित्ताने करीत आहोत.
माहितीसाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा ‘व्हीडिओ बाईट’ देत आहोत…
https://www.instagram.com/p/C_zztQ6CRst/