To The Point : जिल्हा परिषद-पंचायत समितीमध्ये पुणे जिल्ह्यात भाजपाची पिछेहाट!
राष्ट्रवादीची पकड मजबूत : जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद, माजी मंत्री बाळा भेगडे, आमदार राहुल कुल यांचा प्रभाव दिसला नाही
पुणे । विशेष प्रतिनिधी । राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक जागा मिळवून नं.१ राहिली असली तरी, पुणे जिल्ह्यात मात्र भाजपाचा करिष्मा पहायला मिळालेला नाही. जिल्ह्यातील निकालाचा विचार करता भाजपाची कामगिरी सुमार असून, राष्ट्रवादीने आपला गड कायम ठेवला आहे.
राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडले. त्यानंतर दि. ९ फेब्रुवारी रोजी या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत पुणे जिल्हा परिषदेचाही समावेश होता. पुणे जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी जवळपास २९९ तर १३ पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी ५२८ उमदेवार रिंगणात होते.
२०१४ मध्ये राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आली. तेव्हापासून म्हणजे गेल्या १२ वर्षांपासून पुणे जिल्ह्यात भाजपा ‘‘कमळ’’ फुलवण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. अनेक बडे नेते-पदाधिकारी गळाला लावले. पण भाजपाला यश मिळाले नाही. शहरी भागातील पुणे आणि पिंपरी-चिंचवड अशा दोन मोठ्या महानगरपालिका भाजपाच्या ताब्यात आहेत. पण, ग्रामीण भागात मात्र,राष्ट्रवादीची पाळेमुळे भक्कम आहेत.
पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने यशाची परंपरा राखून ठेवली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर झालेल्या या निवडणुकीत सहानुभूतीची लाट दिसून आली. या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्याने त्याचा फायदा दिसून आला. १३ पंचायत समितींपैकी नऊ ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले असून, भाजपाच्या जागांमध्ये तीनने वाढ होत दहा ठिकाणी उमेदवार विजयी झाले. जिल्हा परिषदेच्या माजी २३ सदस्यांनी निवडणूक लढवली त्यापैकी ११ जणांना यश मिळाले असून, माजी उपाध्यक्ष आणि सभापतींसह काही दिग्गजांना पराभव स्वीकारावा लागला आहे.
विशेष म्हणजे, पुणे जिल्ह्यतील एकूण १३ तालुक्यांचा विचार करता जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पार्टीला सात ठिकाणी भोपळासुद्धा फोडता आलेला नाही. राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेच्या ७३ जागांपैकी ७२ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी ५१ जागा राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत. भाजपाने ७३ पैकी ५८ जागा लढवल्या आहेत. त्यापैकी अवघ्या १० भाजपाला जिंकता आल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाने ३६ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी ५ जागा जिंकल्या आहेत. तर शिवसेना उबाठाने २६ जागा लढवल्या आणि ६ जिंकल्या आहेत.
राज्यात भाजपा नं.१ असल्याबाबत प्रदेश पातळीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आनंद साजरा करीत आहेत. मात्र, पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पक्षाला आणखी काम करावे लागेल. जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद, माजी मंत्री बाळा भेगडे, आमदार राहुल कुल यांच्यासह आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, राजगड, इंदापूर या भागात प्रतिनिधीत्व करणाऱ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे. कारण या तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेत पक्षाला भोपळाही फोडता आलेला नाही.
काँग्रेसला एकही जागा नाही…
या निवडणुकीत काँग्रेसला एकाही जागेवर खाते उघडता आले नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सहा जागा मिळवत तिसरा क्रमांक पटकावला, तर शिवसेना चौथ्या क्रमांकावर राहिला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. काँग्रेससह इतर कोणत्याही पक्षांना जिल्हा परिषदेत प्रतिनिधित्व मिळू शकले नाही.
मावळात बाळा भेगडे सपशेल अपयशी…
राष्ट्रवादी काँग्रेसने इंदापूर, मावळ, बारामती आणि राजगड या तालुक्यांमध्ये सर्वच्या सर्व जागा जिंकल्या. मावळात भाजपाचा सुपडासाप झाला. मावळ आमदार सुनील शेळके यांनी नगरपरिषद निवडणुकीप्रमाणे जिल्हा परिषद निवडणुकीतही सर्व जागांवर राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार निवडून आणले आहेत. जिल्हा परिषदेच्या ५ आणि पंचायत समितीच्या १० अशा सर्व जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे. या ठिकाणी भाजपाचे माजी मंत्री बाळा भेगडे सपशेल अपयशी ठरले आहेत.
दौंडमध्ये आमदार राहुल कुल यांच्या पदरी निराशा…
भाजपाचे आमदार राहुल कुल यांना दौंड तालुक्यात अपेक्षित यश मिळाले नाही. सातपैकी केवळ एका जागेवर यश मिळाल्याने हा पराभव त्यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. पंचायत समिती गणात १४ पैकी आठ जागांवर भाजपाने विजय मिळवला आहे.
खेड तालुक्यात शिवसेना उबाठाचे यश…
खेड पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा फडकला असून पंचायत समितीवर एक हाती सत्ता आली आहे. आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीचे १६ पैकी ९ सदस्य विजयी झालेली आहेत. तर जिल्हा परिषदेचे ८ पैकी ५ सदस्य विजयी झालेले आहेत.





