‘मराठा आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय होणार नाही’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन

नागपूर : मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ओबीसी वसतिगृहांच्या केवळ घोषणा झाल्या, मात्र आमच्या सरकारने सत्तेत येताच 60 ओबीसी वसतिगृहे सुरू केली, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
तसेच, आर्थिक महामंडळाला बळकटी देत 10 लाख ओबीसी कुटुंबांना हक्काची घरे दिल्याचेही त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना एकत्रित केले, त्याप्रमाणे आपणही कोणत्याही समाजावर अन्याय करणार नाही, असे फडणवीस यांनी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
हेही वाचा – बोऱ्हाडेवाडी परिसरातील वीज समस्या सोडवण्यासाठी नवीन ‘‘ट्रान्सफॉर्मर’’
दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने 2 सप्टेंबर 2025 रोजी जारी केलेल्या शासनादेशामुळे (जीआर) ओबीसी समाजात असंतोष पसरला आहे. हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र देण्यासाठी हा जीआर काढण्यात आला असून, याअंतर्गत गाव पातळीवर समित्या स्थापन करण्याचा निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने घेतला आहे. मात्र, या जीआरमुळे ओबीसी समाज आक्रमक झाला असून, हा आदेश रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
फडणवीस हेच ओबीसींचे खरे कैवारी : चंद्रशेखर बावनकुळे
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या वादावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा शासनादेश केवळ मराठवाड्यातील चार जिल्ह्यांपुरता मर्यादित आहे. तरीही काँग्रेस नेते यावर राजकारण करत असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला. विदर्भातील ओबीसी समाजाच्या आंदोलनाला चुकीचे कारण पुढे करून काँग्रेस मोर्चे काढत आहे. मात्र, जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहेत, तोपर्यंत ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, “फडणवीस हेच ओबीसींचे खरे कैवारी आहेत.”




