पक्षाने नाही भाषेने हाक दिली आहे.! विजय वडेट्टीवार मोर्चात सहभागी होण्याबाबत सकारात्मक

Vijay Wadettiwar : आगामी ५ जुलैच्या मोर्चासाठी मनसे नेत्यांनी सर्वपक्षीय नेत्यांना यासंबंधी फोन करण्यास सुरुवात केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना फोन केल्यानंतर आता मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. वडेट्टीवार यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडियाच्या माध्यमातून नांदगावकर यांचा फोन आल्याची माहिती दिली असून या मोर्चाबाबत आपील भूमिका स्पष्ट केली आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना पोस्टच्या माध्यमातून त्यांनी मराठीसाठी एकत्र येण्याची ही वेळ असल्याचे म्हटले आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावतीने बाळा नांदगावकर यांनी हिंदी भाषेची सक्ती नको यासाठी मराठी सन्मान मोर्चात सहभागी होण्यासाठी संपर्क केला आहे.
मनसेने केलेल्या फोनवर सकारात्मक भूमिका घेत प्रदेशाध्यक्ष व अन्य वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन मी त्यांना दिले आहे. मराठीसाठी एकत्र येण्याची ही वेळ आहे, ही हाक पक्षाने नाही तर भाषेने दिली आहे… असे स्पष्ट मत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. त्यामुळे मनसेच्या या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
हेही वाचा – Ashadhi Wari 2025 : भाविकांसाठी आनंदवार्ता.! पंढरपुरात विठुरायाचे 24 तास दर्शन, सर्व राजोपचार बंद
त्यापुर्वी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना हिंदी सक्तीविरोधातील काँग्रेसची भूमिका आधीच स्पष्ट असल्याचे सांगितले आहे. ते याबाबत म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती नको, ही आमची भूमिका आम्ही याआधीच मांडली आहे. ठाकरे बंधूंच्या एकत्रित मोर्चाबद्दल विचारले असता, त्यांनी अटींसह समर्थनाची तयारी दर्शवली.
जर दोन्ही भाऊ एकत्र येऊन या विषयावर मोर्चा काढणार असतील, जर कुठल्याही बॅनरशिवाय मराठीसाठी मोर्चा काढला जाणार असेल आणि दोन्ही भावांचे निमंत्रण आले तर आम्ही विचार करू आणि त्याबाबत आमची भूमिका सकारात्मक असेल, असेही वडेट्टीवार यांच्याकडून याआधीच स्पष्टपणे सांगण्यता आले होते.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा




