Ashadhi Wari 2025 : भाविकांसाठी आनंदवार्ता.! पंढरपुरात विठुरायाचे 24 तास दर्शन, सर्व राजोपचार बंद

पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होत असते. यंदा या यात्रा कालावधीत भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी मंदिर समितीने विशेष नियोजन केले आहे. शुक्रवार, २७ जून रोजी शुभ मुहूर्तावर विधिवत पूजेनंतर श्री विठ्ठलाचा पलंग काढण्यात आला. यामुळे भाविकांना २४ तास मुखदर्शन आणि २२.१५ तास पदस्पर्श दर्शनाची सुविधा उपलब्ध झाली आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
या कालावधीत श्री विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीमागे लोड, तर रुक्मिणीमातेच्या मूर्तीच्या पाठीमागे तक्क्या ठेवण्यात आल्या आहेत. पलंग काढल्यामुळे काकडा आरती, पोशाख, धूपारती, शेजारती यांसारखे राजोपचार बंद करण्यात आले असून, नित्यपूजा, महानैवेद्य आणि गंधाक्षता हे राजोपचार सुरू राहतील. ही व्यवस्था १६ जुलै रोजी प्रक्षाळपूजेपर्यंत कायम राहणार आहे.
हेही वाचा – Starlink इंटरनेट येतंय भारतात! स्पीड पासून खर्चापर्यंत सर्वकाही जाणून घ्या
यात्रा कालावधीत भाविकांना सहज दर्शन मिळावे यासाठी मंदिर समितीने व्हीआयपी दर्शन, टोकन दर्शन आणि ऑनलाइन दर्शन बुकिंग पूर्णपणे बंद केले आहे. यामुळे वारकऱ्यांना रांगेतून सुलभपणे दर्शन घेता येणार आहे. मंदिर समितीने केलेल्या नियोजनानुसार, दर मिनिटाला ३५ भाविकांना दर्शनाची संधी मिळेल, तर सुमारे ५० हजार भाविक चरणस्पर्श दर्शन रांगेत सहभागी होऊ शकतील. यासाठी दर्शन रांगेची व्यवस्था सुव्यवस्थितपणे करण्यात आली आहे.
या सुविधेमुळे वारकरी आणि भाविकांना विठुरायाच्या दर्शनाचा आनंद घेता येणार असून, मंदिर परिसरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. मंदिर समितीने भाविकांच्या सोयीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले असून, यात्रा कालावधील दर्शन व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.