“…म्हणून मी शिवसेना सोडली”, नारायण राणेंनी सांगितलं कारण; बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले…

Narayan Rane : माजी केंद्रीय मंत्री व भारतीय जनता पार्टीचे खासदार नारायण राणे यांनी मंगळवारी (२८ ऑक्टोबर) चिपळूण येथील पक्षाच्या एका कार्यक्रमात शिवसेना सोडण्याचं कारण सांगितलं आहे. राणे यांनी शिवसेनेपासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. स्थानिक पातळीवरील कार्यकर्ता ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशी अनेक पदं भूषवल्यानंतर आणि ३९ वर्षे शिवसेनेसाठी काम केल्यानंतर राणे यांनी २००५ साली शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला होता. त्यानंतर त्यांनी स्वतःचा पक्ष, काँग्रेस आणि आता भाजपा असा प्रवास केला आहे. दरम्यान, राणे यांनी चिपळूण येथील कार्यक्रमात शिवसेना सोडण्याचं कारण सांगितलं आहे.
नारायण राणे म्हणाले, “वयाच्या १५ व्या वर्षापासून सलग ३९ वर्षे मी शिवसेनेसाठी काम केलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवसेनेसाठी काम केलं. बाळासाहेब ठाकरे होते तेव्हाची शिवसेना वेगळी होती. त्यांच्यानंतर शिवसेना राहिली नाही. त्यामुळे तुमच्याप्रमाणे मी देखील शिवसेना सोडून भाजपात आलो आणि आज मी भाजपाकडून याच मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलो आहे.”
हेही वाचा – सातारा डॉक्टर प्रकरणात सुषमा अंधारेंची सर्वात मोठी मागणी!
भाजपा खासदार नारायण राणे म्हणाले, “भाजपा हा राष्ट्रीय पक्ष आहे. तो जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. केवळ भारत नव्हे तर जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. या देशाची केंद्रात सत्ता आहे. या संपूर्ण भारतात भाजपाची सत्ता आहे आणि नरेंद्र मोदी हे आपले पंतप्रधान आहेत. पंतप्रधान झाल्यापासून गेली ११ वर्षे ते देशासाठी काम करत आहेत. मोदी जेव्हा भारताचे पंतप्रधान झाले तेव्हा जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांच्या बाबतीत भारत १४ व्या स्थानी होता जो आता पाचव्या क्रमांकावर आला आहे. पुढील काही वर्षात भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालेला दिसेल.”
नारायण राणे यांनी २००५ साली शिवसेना सोडली तेव्हा ते शिवसेनेत एक प्रभावशाली नेते होते. परंतु, उद्धव ठाकरे यांच्याशी असलेल्या मतभेदांमुळे आणि पक्षातील अंतर्गत राजकारणामुळे त्यांनी पक्ष सोडला. पक्ष सोडताना त्यांनी माध्यमांसमोर अशी प्रतिक्रिया दिली होती. शिवसेना सोडल्यानंतर ते काँग्रेसमध्ये सहभागी झाले. त्यानंतर २०१७ मध्ये त्यांनी काँग्रेसही सोडली आणि ‘स्वाभिमान पक्ष’ स्थापन केला. दोन वर्षांनी त्यांनी हा पक्ष बरखास्त करून २०१९ मध्ये भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.




