नगरपालिकांच्या मतमोजणीत अडथळा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करा; राज्य निवडणूक आयुक्तांचे आदेश

मुंबईः राज्यातील २८८ नगरपरिषदा नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या मतमोजणीत कोणी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला किंवा काही अनुचित प्रकार घडल्यास सबंधितावर कठोर कारवाई करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले.
राज्यातील २६४ नगरपालिका, नगरपंचायती अध्यक्ष आणि ६ हजार ४२ सदस्यांसाठी २ डिसेंबरला मतदार पार पडले असून २४ नगरपालिका आणि १५४ सदस्यांसाठी येत्या २० डिसेंबरला मतदान होणार आहे. तर सर्व ठिकाणची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार आहे. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयुक्तांनी दूरचित्र संवादाच्या माध्यमातून संबंधित सर्व जिल्हाधिकारी,पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी संवाद साधून मतमोजणीच्या तयारीचा आढावा घेतला. आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार शर्मा यांच्यासह आयोगातील विविध अधिकारी उपस्थित होते.
मतदान आणि मतमोजणीची सर्व प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी नियोजन करावे. काही अनुचित प्रकार घडल्यास कठोर कारवाई करावी व केलेल्या कारवाईसंदर्भात सर्व प्रसारमाध्यमांना वेळीच अवगत करावे. केलेल्या कारवाईची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडेही पाठवावी. केलेल्या कारवाईबाबत मतदार, उमेदवार, राजकीय पक्ष आदींना माहिती न झाल्यास चुकीचे चित्र उभे राहते, ही बाब टाळण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी असे आदेशही वाघमारे यांनी दिले.
हेही वाचा – मुंबईत भाजप शिवसेनेत 150 जागांवर एकमत, उर्वरित जागांवर निर्णय शिंदे-फडणवीस घेणार
यावेळी काकाणी यांनीही अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना, २० डिसेंबर रोजी मोजक्या ठिकाणी मतदान होत असले तरी २१ डिसेंबर रोजी सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींची मतमोजणी होणार आहे. त्याचे निकाल आणि त्यानंतरची परिस्थिती हाताळण्याच्यादृष्टीने पोलिसांहसह सर्व यंत्रणांनी आपसात समन्वय साधावा. त्याचबरोबर मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे १९ डिसेंबर रोजी रात्री १० वाजल्यानंतर कुठल्याही प्रकारची प्रचाराची जाहिरात इलेक्ट्रॉनिक किंवा मुद्रित माध्यमांतून प्रसिद्ध करता येणार नाही, याबाबत सर्व संबंधिताना आपल्या स्तरावरून अवगत करावे अशा सूचना केल्या.
तर मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टीने सर्व संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी आवश्यक बंदोबस्ताच्यादृष्टीने नियोजन करावे. कुठलीही घटना घडल्यानंतर त्यावर कार्यवाही केली जाते; परंतु कारवाईसंदर्भातल्या बाबी लोकांसमोर येत नाहीत, त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाल्याबाबत चित्र उभे राहते. ते टाळावे अशी सूचना मनोजकुमार शर्मा यांनी दिली.





