सत्यजीत तांबेचं काँग्रेसमधून निलंबन; नाना पटोले यांची घोषणा
![Suspension of Satyajit Tambe from Congress](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/nana-patole-and-satyajeet-tambe-780x470.jpg)
महाविकास आघाडीने अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा
मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील अपक्ष उमेदवार व काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांची पक्षातुन हकालपट्टी करण्यात आली आहे. सत्यजीत तांबेंच्या बंडखोरीनंतर सत्यजीत तांबेंवर पक्षाकडून कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या संदर्भात एक पत्रकार परिषद घेत सत्यजित तांबे यांचे निलंबन करण्यात आले असल्याची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसकडून जितेंद्र आव्हाड तसेच शिवसेना ठाकरे गटाकडून अंबादास दानवे उपस्थित होते.
विधान परिषदेच्या पाच जागांसाठी महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवार शुभांगी पाटील व नागपूर शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे. नाशिक मतदारसंघातील घटनांमुळे डॉ. सुधीर तांबे यांना पक्षाने आधीच निलंबित केले असून सत्यजित तांबेवरही कारवाई केली जाणार आहे, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
विधान परिषद निवडणुकीवरून महाविकास आघाडीत समन्वय असून शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी एकत्रीत चर्चा करून नाशिक व नागपूर मतदार संघाबाबत निर्णय घेतलेला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसची उमेदवारी दिली असतानाही त्यांनी पक्षाशी बेईमानी करत अर्ज दाखल केला नाही त्यामुळे बदललेल्या राजकीय परिस्थितीत नाशिकमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला व नागपूरमध्ये काँग्रेस पुरस्कृत उमेदवार सुधाकर अडबाले यांना मविआचा पाठिंबा आहे. विधान परिषद निवडणूकीत महाविकास आघाडीचे उमेदवार नागपूरमधून सुधाकर अडबाले, अमरावतीमधून धीरज लींगाडे, औरंगाबादमधून विक्रम काळे, नाशिकमधून शुभांगी पाटील व कोकणमधून बाळाराम पाटील असतील. विधान परिषदेच्या या पाचही जागांवर महाविकास आघाडीतील पक्ष कार्यकर्ते एकदिलाने काम करून या पाचही जागा विजयी करतील, असं नाना पटोले म्हणाले.
सोबतच, देशाच्या पंतप्रधानांनी गटाराचं उद्घाटन करणे म्हणजे भाजप एकप्रकारे प्रधानमंत्री पदाच्या गरिमेला धक्का लावत आहे. गेल्या नऊ वर्षांपासून मोदींनी भाजपचा प्रचार करण्याशिवाय काहीच केले नाही. त्यामुळे मोदींनी ग्रामपंचायत, महापालिका किंवा इतर गोष्टींसाठी यावं हा त्यांचा प्रश्न आहे. महागाई, बेरोजगारी हे मुद्देही महत्वाचे आहेत. नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला उमेदवारही मिळाला नाही. भाजपा हा दुसऱ्यांची घरे फोडणारा पक्ष असून पाठीमागून वार करणाऱ्या भाजपाला जनताच धडा शिकवेल, असं नाना पटोले मोदींच्या मुंबई दोऱ्याबाबत म्हणाले.