जपानचे पंतप्रधान सुगा राजीनामा देणार, पक्ष निवडणुकीतूनही माघार
टोकियो – कोरोनाचा मुकाबला करताना कमी पडलेल्या उपाययोजना, अपुरी आरोग्य यंत्रणा आणि ऑलिंपिकच्या आयोजनावरून होणारी टीका याचा परिणाम म्हणजे घटलेली लोकप्रियता. यामुळे जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा राजीनामा देणार आहेत. २९ सप्टेंबरला पक्षाच्या होणाऱ्या नेते पदाची निवडणूक ते लढवणार नाहीत. त्यामुळे जपानला नवीन पंतप्रधान मिळणार आहेत.
जपानच्या सत्ताधारी लिबरल डेमोक्रेटिक पार्टीच्या नेतेपदाची निवडणूक २९ सप्टेंबरला होणार आहे. या निवडणुकीसाठी आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार नसल्याचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी पक्षाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना सांगितले आहे. ते ही निवडणूक लढवणार नसल्याने पक्षाला आणि जपानला नवीन नेता मिळणार आहे. एक वर्षापूर्वी शिंजो आम्बे यांनी राजीनामा दिल्यानंतर सुगा पंतप्रधान झाले होते. परंतु त्यांची लोकप्रियता खूपच कमी झाली आहे. ती ३४ टक्क्यांवर आली असल्यामुळे पक्षाच्या नेतेपदी नवीन नेत्याची निवड झाली नाही तर आगामी निवडणूक जिंकणे अवघड होईल. त्यामुळे पक्षाने नवीन नेता निवडीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २९ सप्टेंबरला नव्या नेत्याची निवड केली जाणार आहे. ही निवडणूक सुगा लढणार नाहीत. त्यामुळे जपानला नवीन नेता आणि पंतप्रधान मिळणार आहेत.




