‘हो मला अध्यक्ष करणार होते, पण..’; सुप्रिया सुळेंचा मोठा गौप्यस्फोट!
मुंबई : शरद पवार यांनी गेल्या काही महिन्यापुर्वी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. यानंतर पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी शरद पवारांच्या निर्णयाला विरोध केला. त्यामुळे शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेतला. दरम्यान, यावरून छगन भुजबळ यांनी मोठं विधान केलं आहे. शरद पवार यांनी राजीनामा देणं हे काही थेट झालं नव्हतं. १५ दिवस आधीच हा विषय झाला होता. शरद पवारांनी राजीनामा द्यायचा, त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांना पक्षाचं अध्यक्षपदी नेमायचं आणि मग राष्ट्रवादीने भाजपाबरोबर जायचं, असं छगन भुजबळ म्हणाले.
छगन भुजबळ यांच्या या दाव्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, शरद पवार मला राष्ट्रवादीचे अध्यक्ष करणार होते. तसा प्रस्ताव होता. परंतु, ही गोष्ट मला स्वतःला अस्वस्थ करणारी होती. कारण त्यात तीन गोष्टी होणार होत्या. पहिली गोष्ट म्हणजे शरद पवार यांची भाजपाबरोबर जाण्याची इच्छा नव्हती. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, असं शरद पवार सगळ्यांना म्हणाले होते, आणि स्वतः काल भुजबळ यांनीदेखील त्याची कबुली दिली आहे.
हेही वाचा – ‘RSS नं मोदींना आताच हिमालयात पाठवावं, देशाचं भलं होईल’; प्रकाश आंबेडकर यांची टीका
मला अस्वस्थ करणारी दुसरी गोष्ट म्हणजे, आमची वैचारिक बैठक वेगळी आहे. आमची वैचारिक बैठक ही यशवंतराव चव्हाण यांची, शरद पवार यांची आहे. या माणसांची विचारधारा हीच आमची विचारधारा आहे. तिसरी गोष्ट म्हणजे, मी अध्यक्ष झाले असते तर सर्वात आधी भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय घ्यावा लागला असता, जे माझ्यासाठी शक्य नव्हतं. कारण मी माझ्या विचारधारेशी, माझ्या वडिलांच्या विचारांशी तडजोड करू शकत नव्हते. माझ्यासाठी ते अशक्य होतं. माझ्या विचारधारेशिवाय मी कशी जगणार? असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
एका बाजूला सत्ता होती आणि दुसऱ्या बाजूला संघर्ष होता. मी सत्तेपेक्षा संघर्षाचा निर्णय घेतला. छगन भुजबळ बोलले ते खरं आहे, मला अध्यक्ष करणार होते. परंतु, मी माझ्या विचारधारेवर ठाम राहिले, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.