‘माझं काही शिजायला लागलं की कुणीतरी पातेल्याला लाथ मारतं’; सुजय विखेंचं विधान चर्चेत

Sujay Vikhe | माजी खासदार सुजय विखे हे संगमनेर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढणार अशी चर्चा सुरु होती. त्याबाबत त्यांनी इच्छाही बोलून दाखवली होती. तसेच संगमनेरमध्ये त्यांनी अनेक सभाही घेतल्या होत्या. पण सुजय विखे यांच्या संगमनेरमधील एका सभेत वसंत देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत बोलताना आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले. यावरून विरोधी पक्षाकडून सुजय विखे यांच्यावरही टीका झाली. मात्र, यानंतर संगमनेरमधून सुजय विखेंची विधानसभेची संधी हुकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर आता स्वत: सुजय विखे यांनी भाष्य केलं आहे.
सुजय विखे नेमकं काय म्हणाले?
माझ्या नशीबात सध्या गडबड सुरु आहे. माझं काही शिजायला लागलं की लगेच कुणीतरी पातेल्याला लाथ मारतंय. लोकसभेच्या निवडणुकीत मार्चपर्यंत एकदम व्यवस्थित होतं. एप्रिलमध्ये काय गडबड झाली माहिती नाही. मग म्हटलं चला खासदारकी गेली मग आमदार होऊ. मग संगमनेरला गेलो. संगमनेरमध्ये चार सभा घेतल्या आणि लोक म्हणाले की आता सुजय विखे हेच आमदार होणार. तेवढ्यात वसंतराव (वसंत देशमुख) उठले आणि आमच्या शिजलेल्या पातेल्याला लाथ मारून टाकली. त्यामुळे माझं काय ग्रहमान लोकांसाठी ठीक दिसत नाही. मला बोलवू नका. तुमचं चाललंय चालूद्या. मी योग्य त्या गोष्टी वेळेवर करेन, असं सुजय विखे म्हणाले.





