सिंधुदुर्ग जिल्हा देशातील पहिला ‘एआय प्रणाली स्वीकारणारा जिल्हा’; ‘सिंधुदुर्ग मॉडेल’चा नीती आयोग करणार अभ्यास

सावंतवाडी : देशातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणाली स्वीकारणारा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ‘एआय मॉडेल’ची आता राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. ‘सिंधुदुर्ग मॉडेल’चा सखोल अभ्यास करण्यासाठी नीती आयोगाचे एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ येत्या ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी दोन दिवसांच्या दौऱ्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, नीती आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ मे २०२५ पासून ‘मार्व्हल कंपनी’च्या माध्यमातून राबविण्यात आलेली एआय प्रणाली आता ‘सिंधुदुर्ग मॉडेल’ बनली आहे. देशाच्या आर्थिक व विकासात्मक नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नीती आयोगाचे प्रतिनिधी या उपक्रमाचा अभ्यास करणार असल्यामुळे ही जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.
नीती आयोगाचे शिष्टमंडळ ३० ऑक्टोबर, सकाळी १० वाजल्यापासून ते ३१ ऑक्टोबर, सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्ह्यात असणार आहे.या दौऱ्यात जिल्हा प्रशासनाने आरोग्य, पोलीस, आरटीओ, जिल्हा परिषद व अन्य विभागांमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यप्रणालीत केलेले सकारात्मक बदल, सुधारणा आणि त्यातील आव्हाने व उपाययोजना यांचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे.
हेही वाचा – पुढील आठवड्यातही पाऊस बरसणार, हवामान विभागाने काय अंदाज दिला?
सर्व विभागप्रमुख आपापल्या विभागात एआयच्या माध्यमातून झालेल्या बदलांची माहिती आयोगासमोर सादर करणार आहेत.ग्रामीण भागातील जिल्हा भविष्यात एआय-सक्षम जिल्हा कसा बनू शकतो, हे नीती आयोग ‘सिंधुदुर्ग मॉडेल’द्वारे समजून घेणार आहे.जिल्ह्याने विकासासाठी एआय तंत्रज्ञानाचा कसा यशस्वीरित्या उपयोग केला आहे, याचे निरीक्षण आणि विश्लेषण आयोगाकडून केले जाईल.
पालकमंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या उपक्रमाबाबत जिल्हा प्रशासनाला मार्गदर्शन केले असून, मुख्य सचिव व इतर वरिष्ठ अधिकारीही यावर लक्ष ठेवून आहेत. नीती आयोगाचा हा अभ्यास ‘सिंधुदुर्ग मॉडेल’ला राष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. ३० व ३१ ऑक्टोबर हे दोन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासातील एआय युगाचे सुवर्णपान ठरणार असल्याचे राणे म्हणाले. या पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमीसे, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम आदी उपस्थित होते.




