मातोश्रीवरील भेटीनंतर शुभांगी पाटीलांचे तांबेंना आव्हान; म्हणाल्या, अब राजा का बेटा राजा नही बनेगा..
![Shubhangi Patil said that now the king will not be the son of the king](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/shubhangi-patil-and-satyajeet-tambe-780x470.jpg)
राजाच्या मुलाला राजा बनविण्यासाठी माझे बलिदान देण्यात येत आहेत
पुणे : नाशिक पदवीधर मतदारसंघात सुधीर तांबे यांनी काँग्रेसकडून अर्ज न भरता सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला. यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नाशिक पदवीधरसाठी उमेदवारी मिळावी म्हणून भाजपत प्रवेश करणाऱ्या शुभांगी पाटील या आज मातोश्रीवर दाखल झाल्या. त्यामुळे आता चर्चाना उधान आलं आहे. यानंतर त्यांनी अब राजा का बेटा राजा नही बनेगा..काम करेल त्यालाच जनता निवडून देईल, असं आव्हान शुभांगी पाटील यांनी सत्यजित तांबे यांना दिलं आहे.
महाविकास आघाडीने आपला अधिकृ उमेदवार निश्चित केला होता. त्यांना एबी फॉर्म देखील दिला. तसेच भाजपकडून दोन जणांना उमेदवारी मिळेल असे सांगण्यात येत होते. त्यातही शुभांगीताई तुम्हाला एबी फॉर्म देऊन असे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मला सांगितले. मात्र दुपारी अडीच वाजता काँग्रेसच्या नेत्याने स्वतःचा अर्ज न भरता स्वतःच्या मुलाचा अपक्ष अर्ज भरला. एवढी नाट्यमय घडामोड कधीही नाशिक पदवीधर निवडणुकीत घडली नव्हती. विचित्र राजकारणाला आपण सामोरे जात आहोत, अशी टीका शुभांगी पाटील यांनी केली आहे.
सामान्य घरातल्या मुलीने राजकारणात पुढे येऊच नये, असे काहींना वाटत आहे. राजाचा मुलगा राजा नाही बनणार. ज्याच्यामध्ये कसब आहे, तोच राजा बनणार. संपूर्ण महाराष्ट्राला माझे कर्तृत्व माहीत आहे. भाजपकडे मी अनेक दिवसांपासून उमेदवारी मागत होते. भाजपनेही माझे काम मान्य केले होते. पण राजाच्या मुलाला राजा बनविण्यासाठी माझे बलिदान देण्यात येत आहे. पण माझ्यासाठी माझे पदवीधर बांधव, डॉक्टर, शिक्षक यांनी घरोघरी जाऊन अर्ज भरले आहेत. त्यामुळे मी ही निवडणूक लढविणारच, असा निर्धार शुभांगी पाटील यांनी केला आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या क्षेत्रात नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर या पाच जिल्ह्यांच्या आणि ५४ तालुक्यांच्या समावेश होतो. मागच्या तीन टर्म काँग्रेसचे डॉ. सुधीर तांबे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. मात्र यावेळी त्यांनी अचानक माघार घेऊन आपला मुलगा सत्यजित तांबे याचा अपक्ष अर्ज त्यांनी भरला. नाशिकच्या पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये आता २२ अपक्ष मैदानात राहिले आहेत.