‘पार्थ पवार किंवा आदिती तटकरे उमेदवार असल्यास लढत सोपी’; श्रीरंग बारणे
![Shrirang Barne said that if Partha Pawar or Aditi Tatkare are the candidates, the fight will be easy](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/Shrirang-Barne-780x470.jpg)
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मावळमधून उमदेवार कोण यासाठी राष्ट्रवादीकडून चाचपणी सुरू आहे. राष्ट्रवादीकडून पुन्हा पार्थ पवार आणि आमदार आदिती तटकरे यांच्या नावाची चर्चा आहे. दरम्यान, यावर शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी भाष्य केलं आहे.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, मी गेली अनेक वर्षे राजकारणात काम करत आहे. निवडणूक डोळ्यापुढे ठेवून मी कधीही काम केलेले नाही. जनमानसात जाऊन, सर्वसामान्यांची कामे सोडविण्याचे काम करतो. अधिक वेळ जनतेसाठी देतो. माझ्यासमोर कोण उमेदवार आहे हे पाहून मी निवडणूक लढलो नाही. येणाऱ्या निवडणुकीत कोणतरी उमेदवार राहणार आहे.
हेही वाचा – Viral Video : वटपौर्णिमेनिमित्ताने पूजा करताना अचानक झाडाला लागली आग
भाजपने मावळ लोकसभा मतदारसंघासाठी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. याबाबत श्रीरंग बारणे म्हणाले की, प्रत्येक पक्षाला संघटना वाढविण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. भाजपने यापूर्वीही लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या अगोदर पक्ष बांधणीचे काम केले आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये भाजप कार्यकर्ते, नेत्यांनी मला मदत केली आहे. पक्ष वाढविण्याच्या दृष्टीकोनातून भाजप संघटनात्मक बांधणी करत आहे. भाजप-शिवसेना शिंदे गट आगामी लोकसभा निवडणुकीला एकत्रित सामोरे जाणार आहे, असंही ते म्हणाले.